आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका, कंपनी मालक आरोपीच्या पिंजऱ्यात, महापौरांचा सावध पवित्रा; तीन तास झडली चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्याकर्मचाऱ्यांकडे साहित्य का नव्हते, इथपासून ते धोकादायक चेंबरमध्ये उतरण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून दमदाटी झाली. कंपनी मालकाने चेंबरला बुजवून ठेवले, यापासून ते चेंबरची जागा बंदिस्त करून त्याचा नियमबाह्य वापर केलाच कसा, असे असंख्य प्रश्न विचारत नगरसेवकांनी महासभेत कंपनी मालक पालिकेच्या आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. कंपनी मालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही लावून धरली. महापौर अशोक मुर्तडक यांनी अनुकंपा तत्त्वावरील वारसांना प्रोबेशनचा कालावधी कमी करण्याव्यतिरिक्त या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात कोणत्याही ठोस सूचना केल्यामुळे नगरसेवकांची निराशा लपून राहिली नाही.

सातपूर येथे चेंबरमध्ये पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून महासभेत चांगलाच गदारोळ झाला. सुधाकर बडगुजर अजय बोरस्ते यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेताना आयुक्तांनाच लक्ष्य केले. सोमेश्वर येथील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. चेंबरमध्ये कर्मचारी उतरले असतील, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग म्हणून प्रशासन प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना आक्रमक होईल, असा इशारा दिला. आजही गटारीत उतरून कर्मचारी सफाई करत असल्याची क्लिप असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

प्रकाश लोंढे यांनी वाहनचालकाला साक्षीदार करत कंपनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाजी सहाणे यांनी तीन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीबाबत नाराजी व्यक्त केली. उपमहापौर गुरमित बग्गा यांनी प्रशासनाला दोष देण्यापेक्षा कंपनी मालकावर सर्वप्रथम कारवाईची मागणी केली. सभागृह नेता सलीम शेख, अनिल मटाले, संभाजी माेरुस्कर यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे वाभाडे काढत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

सर्वच खातेप्रमुखांना महापौरांचा सुरक्षा अलर्ट
सफाईकर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर महापाैर मुर्तडक यांनी सर्वच खातेप्रमुखांना सुरक्षिततेबाबत अलर्ट राहण्याचे आदेश दिले. अग्निशामक दलाने घटनेचा प्रकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे साहित्य घेऊन जावे, अशीही सूचना केली. महापालिकेत सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सांगत सिक्युरिटी अलार्म बंद झाल्याचा गौप्यस्फोट केला. वारंवार सांगूनही यांत्रिकी तपासणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. सुरक्षारक्षकांमधील सुस्ती उडण्यासाठी त्यांच्याकडून कसरती करून घ्याव्यात, तसेच महापालिकेत सर्व लोकप्रतिनिधी-अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र घालूनच यावे, अशी सूचनाही केली.

वारसांना दोन महिन्यांचे मानधन
राष्ट्रवादीचेविनायक खैरे यांनी दोन महिन्यांचे मानधन मृतांच्या वारसांना देण्याची अनाेखी घोषणा केली. तत्पूर्वी वारसांना नोकरी वा आर्थिक मदत देण्यासाठी अनेकांनी घसाफोड केली. मात्र, स्वत: आर्थिक मदत करण्याचे पाऊल उचलले नव्हते. दरम्यान, मनसेचे रमेश धोंगडे यांनी या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर पुढील महासभेत आंदोलन करण्याचा इशाराही दिला.