आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग २७ मध्ये आजी-माजी नगरसेवकांना नवख्यांचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - प्रभाग क्रमांक २७ मध्ये आजी-माजी नगरसेवकांना नवख्या मात्र प्रबळ उमेदवारांचे यंदा आव्हान राहाणार अाहे. खरा सामना हा शिवसेना भाजपमध्येच रंगणार असून, इतर पक्ष कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. सिडको, अंबड, औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी असे या प्रभागाचे स्वरूप अाहे. या प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता सर्वच उमेदवारांचा कस लागणार आहे. जुना प्रभाग ४४ ५१ मिळून नवीन प्रभाग २७ तयार झाला आहे. बालेकिल्ला म्हणून नेहमीच मतदारांनी शिवसेनेच्या पदरात भरभरून मते टाकली अाहेत. 
 
गेल्या निवडणुकीतही संपूर्ण शहरात मनसेची लाट असतानाही या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक उत्तम दोंदे नगरसेविका शोभा फडोळ निवडून आल्या हाेत्या. यावेळी ते पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. माजी नगरसेविका मंदाकिनी दातीर संध्या आहेर याही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तर माजी नगरसेवक पुंजाराम गामणे हे आपल्या कन्येसाठी सेनेकडून दावेदारी करीत आहेत. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक हे सेनेकडून इच्छुक आहेत. तर भाजपकडे सर्वच नवखे उमेदवार असले तरी पक्षाच्या जाेरावर तेही प्रबळ ठरण्याची शक्यता अाहे. या उमेदवारांकडून सेनेला जोरदार टक्कर देतील, अशी शक्यता अाहे. या प्रभागाचे विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टी रिंगणात उतरणार असून त्याचाही परिमाण जाणवेल. मनसेही तयारीनिशी उतरली असून राष्ट्रवादी काँग्रेस मात्र उमेदवारांच्या शोधात आहेत. योग्य उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही जोर लावेल. सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले असून सामजिक कामे, कॅलेंडर, विविध उपक्रमांच्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहचायची संधी सोडत नाहीत. या ठिकाणी जातीय राजकारण अतिशय महत्त्वाचे ठरते. अनेक उमेदवार हे जातीय राजकारणावरच निवडणूक लढवितात. मात्र, यावेळी विकासाचा मुद्दाही त्यांना घ्यावा लागणार आहे. कामगारवर्ग मतदानात महत्त्वाची भूमिका बजावतात. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर या प्रभागात एकीकडे झोपडपट्टी तर दुसरीकडे औद्योगिक वसाहत, जुने गावठाण मोरवाडी, अंबड गाव नवीन वस्ती, सिडको असे भाग येतात त्यामुळे सर्वांशी समतोल साधणारा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असलेला उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. समावेशक असलेल्या या प्रभागात मतदारराजा कुणावर कृपादृष्टी करतात हे येणाऱ्या काळात पहावे लागेल. 


 
बातम्या आणखी आहेत...