आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सुविधांबाबत महापालिका पुरती फेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वेगाने विकसित होणाऱ्या शहरांत नाशिकची गणना होत असली तरी, शहरात अनेक मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आहेत. प्रमुख रस्ते चकचकीत असले तरी बहुतांश भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या आहे. ही समस्या सर्वात मोठी असल्याचे मत ८१ टक्के नाशिककरांनी व्यक्त केले. नाशिकच्या सर्व भागांत एकवेळ मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ७३ टक्के नागरिकांनी तयारी दर्शविली आहे. पाण्याचा अपव्यय होण्यास पालिकेसोबतच नागरिकही जबाबदार असल्याची बाब एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे. घंटागाडी सेवेविषयी मात्र नागरिकांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे.
अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विभागाने ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ही पाहणी केली. शहराची लोकसंख्या १५ लाखांदरम्यान आहे. प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील साडेचार हजार नागरिकांकडून एक प्रश्नावली भरून घेण्यात आली. पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूर नाशिकरोड अशा सहाही विभागातील नागरिकांचा यात समावेश होता. महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, डॉ. हेमंत राजगुरू, लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेक्षण केले गेले.

वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने खड्डेविरहित रस्ते ही लोकांची माफक अपेक्षा असते, मात्र नाशिकमध्ये खड्ड्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले. रस्त्याकडेच्या फुटपाथचा वापर केला जातो असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ५६ टक्के दिसले. मात्र अतिक्रमणे, अस्वच्छता, जनावरांचा राबता इत्यादी कारणांमुळे फुटपाथचा वापर करता येत नाही, असे ३२ टक्के नागरिकांचे मत आहे.

शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे मत ५८ टक्के लोकांनी व्यक्त केले. याचाच अर्थ वाहतूक व्यवस्थेत सुधारणेची गरज आहे. त्याच अनुषंगाने बहुमजली वाहनतळे असावीत, असे मत सुमारे ७६ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. ‘पे अॅड पार्क’ची सेवा सोयीची वाटते, या मताशी ६३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली. हॉकर्स झोन अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न सुटेल, असे ६२ टक्के लोकांना वाटते.

या परिस्थितीत मोकाट भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात पालिका यंत्रणा अपयशी ठरल्याचा अभिप्राय ६४ टक्के लोकांनी नोंदविला. शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढत असल्याचे मत सुमारे ६९ टक्के लोकांनी नोंदविले. पालिकेचे दुर्लक्ष हे झोपडपट्ट्या वाढण्याचे प्रमुख कारण असले तरी राजकीय सोय म्हणूनही झोपडपट्ट्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. परवडणारी घरे उपलब्ध होत नसल्याने झोपडपट्ट्या वाढतात आणि रोजगारीचा प्रश्नही यामागे प्रमुख कारण असल्याचे पाहणीमध्ये पुढे आले. तसेच, इंग्रजी माध्यमांना ७९ टक्के लोकांनी पसंती दर्शविली.
महापालिका सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही नसल्याचे ५५ टक्के लोकांनी सांगितले. दुसरीकडे मात्र ५६ टक्के लोकांनी घंटागाडी प्रभावी असल्याचे मत नोंदविले. काहींनी घंटागाडी प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली. महापालिकेची वैद्यकीय सुविधा चांगली नसल्याचे मत सुमारे ६५ टक्के लोकांनी व्यक्त केले. आरोग्य पर्यावरणासाठी आणखी उद्यानांची गरज ७२ टक्के लोकांनी व्यक्त केली.

अॅप प्रतिसाद नाही
महापालिकेचे ‘मोबाइल अॅप’ अस्तित्वात असले आणि डिजिटल इंडियाचा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी अॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण मात्र तुलनेत कमीच आहे. मोबाइल अॅप वापरत नसल्याचे सुमारे ७६ टक्के लोकांनी नमूद केले.

रस्त्यांवरील खड्डे ८२% तीव्र नापसंती
घंटागाडीची सेवा ५६% समाधानी
‘पे अॅड पार्क’ सुविधा ६३% सकारात्मक
मोकाट जनावरांचा प्रश्न ६४% नापसंती

नागरिकांनी केल्या या सूचना
रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अतिक्रमणे काढावीत, चांगले फूटपाथ असावेत, वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन केल्यास त्याला जबर दंड करण्यात यावा, रस्ता दुभाजक आणि गतिरोधक वाढवावेत, डास निर्मूलन करावे, सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, पथदीपांची देखभाल करावी, पथदीपांची प्रकाश क्षमता वाढवावी, वीजतारा भूमिगत कराव्या, महापालिकेने जनसंपर्क वाढवावा, गटारव्यवस्थेत सुधारणा करावी, नियमित स्वच्छता हवी, उघड्यावरील मांसविक्री बंद करावी, वाहतूक पोलिसांना मास्क पुरवावेत.
बातम्या आणखी आहेत...