आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तालयात 24 लाखांचा अपहार, वीजबिलांत फेरफार, हवालदारावर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या सदनिकांमध्ये खासगी भाडेकरी ठेवत लाखोंच्या अपहाराचा प्रकार ताजा असताना, पोलिस आयुक्तालयातील विविध अास्थापनांच्या वीजबिलांमध्ये फेरफार करत सुमारे २४ लाख ८१ हजारांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशी आणि लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आला आहे. या अपहारामुळे पोलिस प्रशासन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संशयित पोलिस हवालदाराच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयातील मुख्य लिपिक कृष्णा आहिरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संशयित पोलिस हवालदार हिंमत रघुनाथ निकम यांनी सन २०१४ ते २०१६ या तीन वर्षांत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या विविध अास्थापना, पोलिस ठाणे यांच्या मासिक वीजबिलांमध्ये फेरफार फेरबदल करून संपूर्ण बिल भरणा केल्याच्या पावत्या रोखपाल आणि लेखपाल शाखेत जमा करत तीन वर्षांत सुमारे २५ लाखांचा अपहार करत शासनाची फसवणूक केली. 
 
या कर्मचाऱ्यावर बिल भरणा जबाबदारी होती. वीज वितरण कंपनीकडून काही दिवसांपूर्वी थकबाकी असल्याने वीजपुरवठा का बंद करू नये, अशी नोटीस प्रशासन अधिकाऱ्यांना बजावण्यात आली होती. त्यावेळी पोलिस उपआयुक्त प्रशासन यांनी संबंधित टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी लावली होती. 
 
या विभागीय चौकशीत आणि लेखापरीक्षण अहवालानुसार संशयित निकम यांनी मासिक वीजबिलात फेरफार आणि खाडाखोड करून सदर बिल पूर्ण भरल्याचे भासवल्याचे स्पष्ट झाले. विभागीय चौकशी आणि लेखापरीक्षण अहवालात दोषी अाढळल्याने शनिवारी (दि. ४) संशयित निकम यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
दुसरा अपहार उघड 
पोलिस आयुक्तालयात कर्मचाऱ्यांच्या सदनिकांमध्ये खासगी व्यक्ती भाडेकरारावर ठेवत लाखोंचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यानंतर वीजबिलांमध्ये लाखोंचा अपहार झाल्याने यामागे मोठा मासा असण्याची शक्यता आता पोलिस आयुक्तालयात व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासन विभागाकडे या सर्व बाबी असल्याने येथील अधिकारी या अपहारात सहभागी असण्याची चर्चा आयुक्तालयात दबक्या आवाजात सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...