आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणात शहराला जूनपर्यंत पुरेल इतके मुबलक पाणी उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेसाठी शिल्लक असलेला पाणीसाठा जाहीर करत यंदा मुबलक पाणी असतानाही मनपाने काटसरीने पाणी वापरण्याचे आवाहन शहरवासीयांना एकीकडे केले. परंतु, शहरासाठी जूनअखेरपर्यंत पुरेल इतके पाणी नियोजन केले आहे. त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दुसरीकडे स्पष्ट केले अाहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा आपल्या नियोजनशून्यतेचे दर्शन शहरवासीयांना करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
पाऊस कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून वाद झाले. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला. धरणेही तुडुंब भरली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे यंदा पाण्याची चिंता राज्यभर नसल्याचे स्पष्ट झाले. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणही यंदा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची तिळमात्र शंका नसतानाही आता मार्चच्या पहिल्याच दिवशी महापालिकेने आगामी उन्हाळाभरासाठी, पावसाळ्यापर्यंत २३२३.३१ दलघनफूट इतके पाणी शिल्लक असल्याचे जाहीर केले. त्यात गंगापूर धरण समूहात २०२९.३२ दलघफू, दारणात २९३.९९ दलघनफूट इतके पाणी शिल्लक असल्याचे स्पष्ट करत काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले. पण, हे शिल्लक असलेले पाणी मुबलक असतानाही पालिकेने योग्य नियोजन केले नाही. विशेष म्हणजे दररोज १४.४३ दलघनफूट इतक्या पाण्याचा महापालिका करते. प्रत्यक्षात दररोज आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा महापालिका अधिक पाण्याचा उपसा करते. शिवाय त्याचा कुठे हिशेबही ठेवत नाही. गेल्यावर्षी अत्यंत टंचाईच्या काळात मनपाने होणाऱ्या गळतीत सुधारणा केली नसून, यंदा पुन्हा अधिक पाणी असल्याने गळतीकडे दुर्लक्ष केले. धरणातून होणारा पाणी उपसा, जलवाहिनीद्वारे केले जाणारे वितरण यात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा जास्त गळती होते. शिवाय अनेक नळांना तोटी नसल्याने त्यातून बरेच पाणी वाया जाते. या सर्व बाबींकडे पालिकेने यंदा भरपूर पाणी असल्याने दुर्लक्ष केले अाहे. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करावा लागत असल्याने आतापासून पालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु यंदा मनपाला आवश्यक असलेले ४३०० दलघनफूट इतके पाणी आरक्षित ठेवले आहे. ते जून अखेरपर्यंत पुरेल इतके आहे, असे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितले अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...