आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९०% नर्सिंग, तंत्रनिकेतनच्या शुल्कात होणार ४०% कपात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पायाभूत सुविधांचा अभाव असतानाही व्यावसायिक शिक्षणासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या राज्यातील ९० टक्के  महाविद्यालयांना शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाने मोठा दणका दिला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात  तंत्रनिकेतन, नर्सिंग, फार्मसी अभ्यासक्रमांचे शुल्क सरासरी ४० टक्क्यांनी घटणार आहे. राज्यातील २५०० महाविद्यालयांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी शुल्क आकारणीचे प्रस्ताव शिक्षण शुल्क प्राधिकरणास सादर केले आहेत. त्यापैकी सुमारे ३५० प्रस्तावांची तपासणी प्राधिकरणाने पूर्ण केली असून, त्यातील ९० टक्के महाविद्यालयांच्या येत्या वर्षाच्या शुल्कात सरासरी ४० टक्के एवढी घट झाली आहे. या महाविद्यालयांनी सादर केलेला २०१५-१६ चा ताळेबंद आणि समितीच्या सदस्यांना महाविद्यालयांच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी यावरून ही घट करण्यात आली आहे.

महाविद्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद सुविधा अनेक महाविद्यालयांमध्ये धाब्यावर बसवण्यात आल्याचे, खर्च कमी आणि फी आकारणी जास्त असल्याचे, तर काही ठिकाणी चक्क विश्वस्तच कर्मचारी म्हणून लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचे धक्कादायक प्रकार प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत पुढे आले आहेत. असे असताना प्रस्तुत महाविद्यालये एका बाजूला विद्यार्थ्यांकडून अनिर्बंध शुल्क आकारणी करीत होती, तर दुसऱ्या बाजूला याच शुल्कावर आधारित शिष्यवृत्त्यांची  कोट्यवधींची रक्कम समाजकल्याण खात्याकडून होत असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. परिणामी, आता पालकांबरोबरच शासनाचेही पैसे वाचणार आहेत.

आतापर्यंत वरीलपैकी कोणत्याही अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थी जे शुल्क भरायचे ती ‘अंतरिम फी’ समजली जायची. त्यानंतर प्रत्येक महाविद्यालय त्यांच्या शुल्काचे प्रस्ताव शिक्षण शुल्क समितीकडे पाठवत असे. तेथे त्यांची तपासणी होऊन अंतिम शुल्क जाहीर होईपर्यंत दुसरे वर्ष उगवत असे. त्यानंतरही अंतरिम शुल्क आणि अंतिम शुल्क यात काही बदल आल्यास ती घट अनेकदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसे. परंतु, गेल्या दोन वर्षांत यात महत्त्वाचा बदल करण्यात आला. त्यानुसार सन २०१५-१६ च्या अकाउंट्सच्या आधारावर पुढील वर्षाच्या म्हणजे सन २०१७-१८ च्या शुल्कास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेतानाच कमी आणि अंतिम शुल्क भरावे लागणार आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...