आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक नायलाॅन मांजावर यंदापासून पूर्णत: बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवघेणा नायलॉन किंवा काची मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यापुढे अशा मांजाची साठवणूक, विक्री आणि वापर करता येणार नाही. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी महापालिका, नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, न्यायदंडाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असले तरीही नाशिकमध्ये मात्र काही दुकानदारांनी असा मांजा खरेदी करण्यास सुरुवात केली अाहे. अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलिस विभागाकडून सांगण्यात अाले.
नायलाॅन मांजाने तीन वर्षांपूर्वीपर्यंत शेकडाे नाशिककरांचे नाक, कान, गळे, गाल जखमी केले हाेते. पक्षीही माेठ्या प्रमाणात जखमी झाले हाेते. त्यामुळेच ‘दिव्य मराठी’ने नायलाॅन मांजाविराेधात प्रबाेधन केले. जिल्हा प्रशासनासह पालिका पाेलिस प्रशासनानेही या अभियानाला साथ देत मांजा विक्रेत्यांवर छापे टाकले. त्यात शेकडाे किलाे मांजा जप्त करून नष्ट करण्यात अाला. परिणामी, गेल्या दाेन वर्षांपासून संक्रांत सण बहुतांशी नायलाॅन मांजामुक्त झाला. त्यानंतर पक्ष्यांना आणि मानवालाही हाेणारा धाेका लक्षात घेत शासनाने राज्यात त्याच्या विक्रीला बंदी घातली. राज्य सरकारने ही अधिसूचना पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांजावर बंदी घालण्यासाठी ‘पेटा’ या संस्थेने याचिका दाखल केली होती. तत्पूर्वी ‘पेटा’ने सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला आवाहन करून मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणबदल विभागाला पत्र पाठवून याबाबत पावले उचलण्याची मागणी संस्थेने केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले की, नागरिकांनी नायलाॅन मांजा वापरू नये. नायलाॅनचा मांजा वापरल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे शासनाच्या अादेशात म्हटलेले असतानाही काही ‘महाभाग’ दुकानदार नायलाॅन मांजाची खरेदी करीत असल्याचे निदर्शनास येत अाहे.

१८जून २०१६ ला निघाले बंदीचे अादेश : पर्यावरणविभागानेही यासंदर्भात अधिसूचना जारी करून पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजासारख्या धोकादायक पदार्थाची विक्री आणि साठवणूक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा याकरिता जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेत करण्यात आली आहे. परंतु, महसूल अधिकारी अधिसूचनेचा विपर्यास करून व्यापारी प्रतिष्ठानांवर छापे टाकून त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करीत असल्याचा दावा काही पतंग व्यापाऱ्यांनी केला हाेता. संबंधित व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेला पेटा या स्वयंसेवी संस्थेने आणि एका सामाजिक कार्यकर्त्याने विरोध केला. उच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांची मागणी फेटाळून लावली होती.

तसेच, केवळ संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला बंदी घालण्यापेक्षा नायलॉन मांजाला कायमस्वरूपी बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरण ठरवावे, असे निर्देश सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने १८ जून २०१६ ला नायलाॅन मांजाची साठवणूक, विक्री अाणि वापराला बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई
नायलाॅन मांजाची विक्री करणे जसे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार अाहे, त्याचप्रमाणे मांजाची खरेदी करणेही बेकायदेशीर कृत्य ठरणार अाहे. त्यामुळे नायलाॅन मांजाची खरेदीच करायची नाही, अशी भूमिका यंदा पतंगप्रेमींना घ्यावी लागणार अाहे.

कलम ४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल
^‘नायलाॅनमांजा खरेदी-विक्रीस न्यायालयाने मनाई केेली असल्याने अशी कृती करणाऱ्यांवर भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४४ नुसार कारवाई हाेईल. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाईल. -लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपायुक्त

या भागात स्टाॅक केला जाताेय नायलाॅन मांजा
{ रविवार पेठ
{ रविवार कारंजा
{ पंचवटी
{ सावतानगर, पवननगर
{ जुने नाशिक, भद्रकाली
बातम्या आणखी आहेत...