आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या दिवशीही समृद्धी महामार्गाला विरोध कायम; दमदाटी केल्यास आत्मदहनाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सिन्नरमधील शिवडे गावातील शेतकऱ्यांचा सलग पाचव्या दिवशीही  प्रखर विरोध कायम होता. प्रशासनही मोजणी करणारच या  आपल्या भूमिकेवर ठाम असताना शेतकऱ्यांनीही थेट रॉकेल, डिझेलच्या कॅनही तेथे आणत मोजणी सुरू होताच आत्मदहन करण्याचीही तयारी केल्याने आता हा प्रश्न अधिकच चिघळला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही याची कुणकुण लागल्याने त्यांनी मंगळवारी सर्वेक्षणाला जाणेच टाळत ग्रामस्थांच्या रोषापुढे नमते घेतले. 
   
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई हा ७१० किलोमीटरचा कॉरिडॉर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील ४६ गावांतून जातो. प्रशासनाच्या वतीने या मार्गाच्या मोजणीचे काम सध्या सुरू आहे. आदेशानुसार मार्चअखेर मोजणी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील विरोधामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही.  

सिन्नर आणि इगतपुरीतील काही गावांमधून विरोध झाला. प्रशासनाने पोलिस संरक्षणात मोजणीही केली. पण सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील शेतकऱ्यांनी हरकत घेत सर्वेक्षण, मोजणीस तीव्र विरोध दर्शवला. प्रसंगी जीव गेला तरी चालेल  पण जमीन देणार नाही, अशी भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठकही निष्फळ ठरवली. बैठकीत तोडगा निघण्याऐवजी संघर्षाची ठिणगी पडली. शेतकरी थेट आत्महत्या करण्याची भाषा करू लागले. मंगळवारी शिवडे गावातील शेतकऱ्यांनी दिवसभर प्रशासनाच्या प्रतीक्षेत गावातच ठाण मांडले. मोजणीसाठी योग्य परिस्थिती नसल्याने अधिकारी येथे आले नाहीत.  

दमदाटी केल्यास आत्मदहन करू  
सर्वच शेतकऱ्यांनी रॉकेल, डिझेलच्या कॅन आत्मदहनासाठी आणून ठेवल्या आहेत. अधिकाऱ्यांनी बळजबरीने मोजणी केल्यास थेट अंगावर रॉकेल डिझेल ओतून घेण्याची तयारी सर्वच शेतकऱ्यांनी केली आहे. काहींनी तर थेट सरण रचून ठेवले अाहे. 
- प्रभाकर हारक, माजी सरपंच, शिवडे
बातम्या आणखी आहेत...