आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेवीकांच्‍या मोर्चाला सामाेरे जाणे टाळून पंकजा मुंडे परळी दौऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
नाशिक- वाढीव मानधनाच्या मागणीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी  बेमुदत संप पुकारला अाहे. २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या ४० वर्षांपासून बालकांच्या पोषणाची जबाबदारी पार पाडत असताना, शासनाने केवळ वेळकाढूपणामुळे गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न भिजत ठेवल्याने ही परिस्थिती उदभवली असल्याचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा अाक्षेप अाहे.  दरम्यान, मंगळवारी कृती समितीच्या वतीने मुंबईत काढण्यात अालल्या माेर्चाला सामाेरे जाण्याएेवजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे परळीला निघून गेल्यामुळे सेविका व मदतनीस यांच्यात नाराजी आहे. आता जोपर्यंत मुख्यमंत्रीच  मानधन वाढीचा ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. दरम्यान, मानधनवाढीसाठी नेमका किती निधी लागेल याची माहितीच संबंधित विभागाला नसल्याचे समाेर अाले अाहे.  

राज्यात ९७ हजार अंगणवाडी सेविका, ९६ हजार मदतनीस आणि १२ हजार मिनी अंगणवाड्यांच्या सेविका अशा जवळजवळ २ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सध्या अंगणवाडी सेविकांना ५ हजार २३, मिनी अंगणवाडी सेविकांना ३,२५० आणि मदतनीसांना २५०० रुपये मानधन आहे. हे वाढवून मिळावे या मागणीसाठी अांदाेलन पुकारण्यात अाले अाहे. यापूर्वी राज्यभर माेर्चे काढल्यानंतर २७ जुलै, २ ऑगस्ट आणि २० ऑगस्ट या तीन दिवशी झालेल्या बैठकांमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसांत याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले होते.

संपाबाबत लेखी पूर्वकल्पना देऊनही १२ सप्टेंबरच्या मोर्चाच्या वेळी मुंडे मुंबईत उपस्थित न राहिल्याने अखेरीस मोर्चेकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. मात्र, तेही कृती समितीचे समाधान करू शकले नाहीत. वाढीव मानधनासाठी किती अतिरिक्त निधी लागणार आहे याचा आकडा अर्थमंत्र्यांनी विचारला असता, महिला व बालविकास खात्याकडे तो उपलब्ध नसल्याचे समाेर अाले अाहे. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पानंतर प्रत्येक खात्याला अतिरिक्त निधी देण्यात आल्याने, आता सेविकांच्या वाढीव मानधनासाठी निधी उपलब्ध नाही, तो द्यायचा असेल तर दुसऱ्या खात्यातून द्यावा लागेल, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली अाहे. मात्र, महिला व बालविकास खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मानधनवाढीच्या समितीनेही सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ मान्य केली अाहे. त्यामुळे ‘दुसऱ्यांचे काढून आम्हाला देऊ नका, तर आमच्या हक्काचे आम्हाला द्या’, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.   
 
कुपोषणाचा प्रश्न शासनामुळे चिघळला
४० वर्षांपासून अंगणवाडीसेविका कधी तुटपुंज्या मानधनात, तर कधी पदरमोड करून कुपोषित मुलांच्या पोषणाची जबाबदारी पार पाडत आहेत. अशा वेळी मानधनवाढीसाठीचा संप सुरू झाल्यावर त्यांच्यामुळे कुपोषित बालकांना धोका निर्माण झाल्याचा शासनाचा आरोप हास्यास्पद आहे. पाच महिन्यांपासून  याबाबत शासनाकडे अर्ज-विनंत्या केल्या, मात्र त्याचा उपयाेग झाला नाही. 
शुभा शमीम, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
बातम्या आणखी आहेत...