आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे दाेन दिवसांत अादेश निघणार, सुभेदारांची साखळी खंडित हाेणार का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोलिसठाण्यांमध्ये पाच ते सहा वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केलेल्या पाेलिस शिपाई ते उपनिरीक्षकापर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली अाहे. येत्या दाेन दिवसांत साधारणत: ३५० कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे अादेश निघणार असून, यातही वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्यांत लावलेल्या नियमाप्रमाणेच साइड ब्रँचमध्ये काम करणाऱ्यांना गुन्हा शाेध पथके, पाेलिस ठाण्यात नियुक्ती दिली जाणार अाहे. अायुक्तांचा हा निर्णय पारदर्शी असला तरी प्रत्यक्षात शहरातील वाढती गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांना बाजूला केल्यास परिस्थिती बिकट हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.

म्हसरुळ, मुंबई नाका ही दोन नवीन ठाणी वगळता ११ पोलिस ठाण्यांत सेवाकाळ पूर्ण झालेल्या जवळपास ३५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित झाल्या आहेत. नुकत्याच पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, सहायक आयुक्त, उपआयुक्तांच्या बदल्या झाल्या. दीड ते दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या या वरिष्ठ निरीक्षकांपैकी काहींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अननुभवी अधिकाऱ्यांवर पोलिस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली. या धक्का तंत्राप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतही आयुक्त हेच तंत्र वापरणार असल्याचे सांगण्यात येत अाहे.

विशेष म्हणजे, या बदल्यांच्या पूर्वीच अायुक्तांनी मातब्बर समजल्या जाणाऱ्या दाेघा कर्मचाऱ्यांच्या बदलीतून सूचित केले अाहे. कायम गुन्हे शोध पथकात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘सोयी’च्या ठिकाणी बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावल्यासाठी, तर यापूर्वी ज्या वरिष्ठ निरीक्षकांच्या दिमतीला कामे केलेल्यांनीही अापल्या परीने भेटीगाठी सुरू केल्या अाहेत. यात काही निरीक्षकांनी देखील ‘माेजक्या सुभेदारांसाठी’ थेट वरिष्ठांपर्यंत शब्द टाकल्याची चर्चा रंगत अाहे. मात्र आयुक्तांकडून या लॉबिंगला छेद देण्याची दाट शक्यता अाहे. यात, पूर्वापार ‘मलईदार’ समजल्या जाणाऱ्या भद्रकाली, पंचवटी, अंबड, सातपूर, गंगापूर पाेलिस ठाण्यांसाठी गर्दी हाेताना दिसत अाहे.

दरम्यान, अायुक्तांकडून नियमानुसार अाढावा घेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव मिळावा, यासाठी विशेष शाखा इतर विभागांत नियुक्ती देण्याचे अादेश दिले अाहेत. तर जे कर्मचारी प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे टेबलावर कागदपत्रे बनवितात, त्यांना अनुभवासाठी त्यांच्याकडून वाढती गु्हेगारी नियंत्रणासाठी विशेष पथकांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याचे बाेले जात अाहे.

अायुक्तालय स्थापनेपासून पाेलिस ठाण्यांमध्ये निर्माण झालेल्या सुभेदारांची (कलेक्टर) साखळी खंडित करण्याचे काम तत्कालीन अायुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले हाेते. त्यांनी प्रथमच अाठ ते दहा वर्षे सुभेदारी करणाऱ्या जवळपास सर्वच कर्मचऱ्यांना नियंत्रण कक्ष, विशेष शाखेत बसविले हाेते. मात्र, त्यांच्यानंतर ही साखळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, अशा कर्मचाऱ्यांचा शाेध घेऊन विद्यमान अायुक्त या सक्रियेवर अंकुश बसवितात, की अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना कायम ठेवतात, याविषयी अायुक्तालयातच चर्चा रंगली अाहे.

पारपत्र पडताळणी करण्यासाठी ‘शुल्क’
अायुक्त स्वच्छ, पारदर्शी कारभार हाकत असतानाच, प्रमुख पाेलिस ठाण्यांत पारपत्र पडताळणी कामांसाठी ‘नियमबाह्य शुल्क’ वसूल केले जात अाहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षकही काणाडाेळा करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात अाहे. माेजक्या दाेन-तीन पाेलिस ठाण्यांत कुठलेही शुल्क लागत नसताना उर्वरित पाेलिस ठाण्यांमध्ये मात्र, सर्रास ३०० ते ५०० रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात अाहे. अशा कर्मचाऱ्यांवर अायुक्त काय कारवाई करणार वा त्यांच्या कुठे बदल्या करणार, याकडे लक्ष लागले अाहे.

शहरातील सिटी सेंटर माॅल ते एबीबी सर्कल रस्त्यावर भरगाव वेगात येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने दुसऱ्या चारचाकी वाहनातील महिला जबर जखमी होऊन गाडीत अडकली. नागरिकांनी गाडीतून काढून त्यांना रिक्षात घालून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान कारचालक गाडी साेडून फरार झाला.
बातम्या आणखी आहेत...