आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्मार्ट सिटी'च्या नावाने परिवहन समितीची टूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे हे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेचे आद्यकर्तव्य असताना, आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली यापूर्वी अव्यवहार्य किंबहुना पांढरा हत्ती म्हणून गणले जाणारे प्रकल्प पुन्हा राबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण समितीपाठोपाठ परिवहन समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, समिती गठित झाल्यानंतर सोलापूरमध्ये सध्या पडीक असलेल्या बसेस कमी दरात खरेदी करून शहर बससेवेचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होणार असल्याचे समजते.
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे अनेक प्रकल्पांसह विकासकामेदेखील ठप्प झाली आहेत. पैसे नसल्यामुळे खासगीकरणातून ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याची वेळ सत्ताधारी असलेल्या मनसेवर आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोदापार्क, फाळके स्मारक, पांडवलेणी येथील बॉटनिकल गार्डन अशा विविध प्रकल्पांसाठी प्रायोजकांचा शोध घेतला गेला वा अद्यापही सुरूच आहे. अशातच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात नाशिकचा समावेश होण्याची शक्यता दिसत असून, तसे झाले तर दिखाऊ अशा मोठ्या योजना पूर्ण करण्याचे स्वप्न सध्या दाखवले जात आहे. स्मार्ट सिटीसाठी काही महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून, यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची समस्या सोडवण्यासाठी उपाय योजण्याचा दावा केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीआरटीएस वा शहर बससेवा ताब्यात घेऊन महापालिकेमार्फत प्रवासी सेवा देण्याचे पर्याय पुढे आल्याचे समजते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली तर त्याचे सुकाणू लाेकप्रतिनिधींच्या हाती असावे म्हणून परिवहन समिती गठित करणे अपरिहार्य ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन समिती स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचे समजते. दरम्यान, यापूर्वी २००९ मध्ये जवाहरलाल नागरी नेहरू पुनरुत्थान अभियानांतर्गत शंभर बसेस खरेदी करण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी परिवहन समिती गठित करण्याची मागणी पुढे आली होती. मात्र, नगरसेवकांनी संबंधित योजना चालवणे महापालिकेचे काम नाही तितकी आर्थिक क्षमता नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर प्रस्ताव रद्द झाला होता.
काँग्रेस नेत्यांचे होते स्वप्न
२००९मध्ये काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते उत्तम कांबळे यांनी शहर बससेवा महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यासाठी पुढाकार घेतला होता. तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या काळात इंदूर येथे अभ्यास दौराही झाला होता. पुढे अनेक मुद्दे उपस्थित करून संपूर्ण सभागृहानेच विराेध करीत एसटीचा पांढरा हत्ती पोसण्यास नकार दिला होता.
सुरत, इंदूर, नागपूरला पाहणीसाठी ‘टुरटूर’
परिवहन समिती स्थापन करण्यापूर्वी जेथे महापालिकेमार्फत शहर बससेवा व्यवस्थितपणे सुरू आहे, अशा प्रकल्पांच्या पाहणीचे नियोजन आहे. त्याबरोबर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा अशा प्रकल्पांच्या पाहणीसाठी नगरसेवकांचे इंदूर, सुरत, अहमदाबाद तसेच नागपूरला अभ्यास दौरे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जे नगरसेवक येतील, त्यांना सोबत नेले जाणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...