आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: बनावट रेशनकार्ड तयार करण्याचे रॅकेट उद‌्ध्वस्त, नगरसेवकांचेही ओळखीचे प्रमाणपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक - पंचवटीतील गाेदावरी चेंबर या इमारतीच्या तळघरातील अग्रवाल असाेसिएशन येथे बनावट रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विविध शाळांचे दाखले, अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अाला. तहसीलदार गणेश राठोड यांनी या इमारतीत साेमवारी (दि. १०) टाकलेल्या छाप्यात सर्व पुरावे ताब्यात घेत पंचवटी पोलिस ठाण्यात प्रमोद नार्वेकर आणि हरिश्चंद्र अग्रवाल या दोन संशयीतांनावर गुन्हा दाखल करण्यात अाला असून, अग्रवाल यास पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. 
 
पंचवटी महाविद्यालयासमाेरील या इमारतीच्या तळघरात गाळा क्रमांक मध्ये बनावट रेशनकार्ड बनविले जात असल्याची माहिती प्रभारी धान्य वितरण अधिकारी तहसीलदार गणेश राठोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी दुपारी या ठिकाणी पुरवठा निरीक्षक डेबे आणि नायब तहसीलदार शे‌वाळे यांच्यासह छापा टाकला. त्यात त्यांना बनावट रेशनकार्डसह, कोरे, स्वाक्षरी केलेल पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आढळून आले. बनावट शिक्के, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, सध्याच्या आणि बदली झालेल्या जुन्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे जातीचे दाखलेही आढळून आले. मनपाचे जन्म मृत्यूचे कोरे प्रमाणपत्र आढळून आले. विशेष म्हणजे शाळांचेही दाखलेही येथे आढळून आले. 

हा सर्वच गोरखधंदा उघड झाल्यानंतर तहसीलदारांना लागलीच पंचवटी पोलिसांना पाचारण केले. सर्व पुरावे ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामे सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक बर्डेकर यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपासही सुरू आहे. 

याप्रकरणी हरिश्चंद्र रामचंद्र अग्रवाल (५२, रा. गुंजाळबाबानगर, हिरावाडी, पंचवटी) या संशयिताला पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. तर, दुसरा संशयित प्रमाेद नार्वेकर (६५) हा फरार अाहे. यापूर्वीही त्याच्यावर नाशिकराेड पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, ताे एजंटगिरीचे काम करत असल्याचे पाेलिसांंनी सांगितले. 

मुख्याध्यापकांचेशिक्के, शाळांचे दाखले आढळले : पोलिसांनीटाकलेल्या छाप्यात शहरातील रुंग्टा शाळा, कन्या कोठारी, गांधीनगरच्या जनता विद्यालयाचे, तसेच परतूर आणि चाळीसगाव येथील काही शाळांतील दाखले, मुख्याध्यापकांचे शिक्केही आढळून आले आहे. 
कोरेसातबाराही मिळाले : दाखल्यांसोबतचयेथे कोरे सात-बारा उतारे सापडले आहेत. शिवाय ठाणे जिल्ह्यातील वाडा तहसीलदारांचा उताऱ्यावरुन नाव कमी केल्याचा उतारा, शिधापत्रिका नियंत्रक मुंबई येथील नाव कमी केल्याचे १०० बनावट दाखले आढळून आले आहेत. 
 
नगरसेवकांचेही ओळखीचे प्रमाणपत्र 
काही दाखल्यांसाठी आवश्यक ओळखीच्या प्रमाणपत्रांमध्ये माजी उपमहापौर नगरसेवक गुरुमित बग्गा, माजी नगरसेवक पवन पवार, बाबूराव मोजाड यांचे ओळखपत्रही आढळून आले आहे. हे ओळखपत्रही बनावट असण्याची शक्यता राठोड यांनी व्यक्त केली आहे. 
 
प्रांत-तहसीलदारांचे बनावट शिक्के 
दाखल्यांसोबत नाशिक प्रांत, नाशिक आणि चांदवड तहसीलदार, धान्य वितरण अधिकारी नाशिक, तलाठी नाशिक यांचेही बनावट शिक्के सापडले आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...