आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेसेवा सात तास खाेळंबली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वेस्थानकाजवळ शनिवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक तब्बल सात तास विस्कळीत झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांची आणि शनिवारी रविवारी सुटी असलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. तर, काही प्रवाशांनी तिकिटाचे पैसे परत घेण्यासाठी नाशिकरोड स्टेशन प्रबंधकांना घेराव घालत तिकीट रद्द करण्याची विनंती केली. सकाळी ११.३० नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान तुटली होती. त्यामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. थेट कसाऱ्यापासून ते नांदगावपर्यंतच्या स्टेशनवर प्रवासी गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. तर, नाशिकरोड रेल्वे स्थानकामध्ये सेवाग्राम आणि दुरांतो एक्स्प्रेस सकाळी वाजेपासून थांबलेल्या होत्या. पंचवटी एक्स्प्रेस अस्वली रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली होती. मात्र, एक तासाहून अधिक वेळ झाल्याने चाकरमान्यांनी कामावर जाण्याचे टाळून पुन्हा परतीचा मार्ग धरला. चौथा शनिवार असल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद असल्याने प्रवाशांची गर्दी तुलनेत कमी होती. बहुतांश प्रवाशांनी घोटी, इगतपुरी या ठिकाणाहून वाहनांनी प्रवास करण्याला पसंती दिली. तर, नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.

या गाड्या झाल्या येथे रद्द
मनमाड - गोदावरी एक्स्प्रेस, इगतपुरी - पंचवटी एक्स्प्रेस, मुंबईहून परत येणारी पंचवटी एक्स्प्रेस, इगतपुरी - पुणे- भुसावळ एक्स्प्रेस.
अस्वली - पंचवटी एक्सप्रेस, घोटी - राज्यराणी एक्स्प्रेस, देवळाली कॅम्प - जनता एक्स्प्रेस, नाशिकरोड - सेवाग्राम, दुरांतो एक्स्प्रेस, आटगाव - देवगिरी एक्स्प्रेस, ओढा - गरीबरथ, लासलगाव - वाराणसी एक्स्प्रेस, घोटी - पंजाब मेल, मनमाड - जनशताब्दी एक्स्प्रेस, इगतपुरी - कृषीनगर, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस.

सध्या रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे देशभरातील रेल्वेमार्ग, रेल्वे वायर, सिग्नल यंत्रणा यांची दुरुस्ती करण्यासाठी रेल्वे यंत्रणेला पुरेसा वेळही मिळत नाही. त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश प्रवासी रेल्वेगाड्या या तोट्यात सुरू आहेत. त्यातच फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून, केवळ वातानुकूलित डबेच हे नफ्यात अाहेत. याबाबतची माहिती रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनाही आहे, परंतु मंत्र्यासमोर कोण बोलणार म्हणून असे प्रकार होत असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले.

प्रवासच रद्द केला
^मुंबईला दुपारी दोन वाजता काम होते. मात्र, साडेअकरा येथेच वाजले असून, अजूनही रेल्वे सुरू नाही त्यामुळे आता जाणे रद्दच करण्याची नामुष्की आली आहे. -अनुष्का चौधरी, प्रवासी
सकाळपासून गाडीची प्रतीक्षा

^आम्हीसकाळपासूनगाडी निघण्याची प्रतीक्षा करीत आहोत. मात्र, कोणतेही सुचित्र दिसत नाही. -रमेश शर्मा, प्रवासी

टप्प्याटप्प्याने दुरुस्तीची गरज
^रेल्वेच्या समस्याया दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्याची गरज आहे. -राजेंद्र फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

तांत्रिक कारणामुळे वायर तुटली
^तांत्रिक कारणामुळे वायर तुटली असेल. साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत सर्व वाहतूक सुरळीत होईल. -एम. बी. सक्सेना, स्टेशन प्रबंधक, नाशिकरोड
बातम्या आणखी आहेत...