आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईद खरेदीसाठी बाजारात ‘रौनक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रमजान महिन्याचे शेवटचे पर्व सुरू असून, आगामी ‘इदूल फित्र’ अर्थात रमजान ईदसाठी खरेदीसाठी प्रचंड गर्दी हाेत आहे. लहान-थोरांसह महिलांची गर्दी बाजारात दिसून येत आहे. तयार कपड्यांमध्ये ‘अनारकली’ ‘अंब्रेला’ ड्रेस युवतींचे आकर्षण ठरत आहे. तर ईदसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत असल्याने बाजारात ‘रौनक’ आली आहे. 
 
पवित्र रमजानच्या ३० रोजांपैकी २७ रोजे पूर्ण झाले आहेत. आता वेध लागले आहेत ते ईदचे. ईदच्या स्वागतासाठी प्रचंड उत्साह दिसून येत अाहे. विशेषत: महिला, युवती लहान मुलांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. यामुळे जुन्या शहरातील मेनरोड शालिमार येथील बाजारपेठा फुलून गेल्या अाहेत. सध्या बाजारात राजस्थान, बंगाल, आंध्र प्रदेश येथील बांगड्यांची आवक अधिक असून तितकीच पसंतीही मिळत अाहे. काचेच्या बांगड्यांऐवजी ब्रास, प्लास्टिकच्या बांगड्यांना जास्त मागणी असल्याचे बांगड्यांच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. महिलांमध्ये जरतारी काम केलेले, लखनवी चिकनचे काम केलेले कुर्ते, तसेच जरतरी जरदोशी वर्कने सजवलेल्या साड्यांना पसंती वाढली आहे. कलकत्ता, कानपूर, दिल्ली येथील चप्पल-बुटांच्या बाजारातही रेलचेल आहे. युवकांमध्ये कानपूर दिल्ली येथील खास बुटांना मागणी असून, कुर्ता-पायजामावर घालण्यासाठी कोल्हापुरी चपलांनाही मागणी असल्याचे दिसून येते. 

खाद्यपदार्थांच्या बाजारातही दरवळ : रमजानईदचे वैशिष्ट असलेल्या ‘शिरखुर्मा’साठी लागणाऱ्या शेवया ‘सुकामेव्या’ची विविध दुकानेही जुन्या नाशकात ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. यामध्ये हैदराबादच्या विविध प्रकारच्या शेवया उपलब्ध आहेत. यामध्ये तुपात तळलेली, भाजलेल्या साध्या तसेच ‘चुट्ट्या’च्या शेवया उपलब्ध आहेत. गव्हाच्या पिठापासून केलेल्या मशिनद्वारे तयार केलेल्या या शेवया हातापासून केलेल्या शेवयांपासून जास्त बारीक स्वादिष्ट असतात. तसेच आयत्या तळलेल्या शेवया मिळत असल्यामुळे महिला या तळलेल्या शेवयांना जास्त पसंत करत आहेत. 

वैविध्यपूर्ण सुकामेवा बाजारात : शिरखुर्मामध्येवापरण्यात येणारा सुकामेवाही बाजारात आला आहे. ज्यामध्ये बदाम, काजू, मनुका, चिरोंजी, खरबूज टरबूज बी, खोबरा, खोबरा खीस, अखरोट तसेच अरब, इराण, येमेन येथील जवळपास २५ ते ३० प्रकारचे पेंडखजूर या दुकानावर उपलब्ध आहेत. ६० रुपयांपासून ते ४०० रुपये प्रतिकलोप्रमाणे हे पेंडखजूर बाजारात उपलब्ध झाले आहेत. 

महिला, युवती लहान मुलांची खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी हाेत असल्याने जुन्या नाशकातील मेनरोड शालिमार येथील बाजारपेठा अशा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या दिसून अाल्या. 
फॅन्सी टाेप्यांचीही क्रेझ : बाजारपेठेत अफगाणी, इंडाेनेशिया, तुर्की येथील फॅन्सी टाेप्या दाखल झाल्या अाहेत. या टाेप्यांच्या खरेदीची युवकांत माेठी क्रेझ दिसून येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...