आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीचा वेळ गेला एटीएमवर रांगांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शुक्रवारी मिळालेले हजार रुपये तीन दिवसांच्या सलग सुटीत संपल्यानंतर घरखर्चासाठी संपूर्णपणे एटीएमवरच भिस्त असलेल्या ग्राहकांची सोमवारी चांगलीच अडचण झाली. शहरासह परिसरातील ८० टक्क्यांहून अधिक एटीएम बंद असल्याने आणि सुरू असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएमही तासांतच रिकामे होत असल्याने नाशिककरांना सुट्यांचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक नोटांसाठी एटीएमचाच शोध घेण्याची वेळ आली. मिळालेली सुटी पैसे काढण्यात गेल्याने बँकांच्या नियोजनशून्यतेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचेही स्पष्टपणे सोमवारी दिसून आले.
नवीन नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बँकांकडून नाेटांचे वितरण करताना काटकसर केली जात अाहे. नागरिकांना दोन हजारच्या दोन नोटांसाठी एटीएमवर तासन््तास रांगेत उभे राहावे लागत असताना, दुसरीकडे देशभर आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटांचे घबाडच बाहेर येत आहे. नाशिककरांना दोन हजार रुपयांसाठी वणवण फिरावे लागल्याचे चित्र रविवारसह सोमवारी संपूर्ण शहरात दिसून आले. शहरातील एम. जी. रोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोडवरील एटीएमला भेट दिली असता येथील बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, एचडीएफसी या बँकांचे बहुतांश एटीएम बंद दिसून आले. तर, काही एटीएम रक्कम भरल्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंतच रिकामे झालेे. या एटीएममध्ये पुन्हा रक्कम भरण्याचे नियाेजन बँकांकडून दिसले नाही. केवळ एसबीआयचे काही एटीएम सुरू होते. मात्र, या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी माेठ्या रांगा लागल्या हाेत्या. त्यामुळे तेही ३-४ तासांतच रिकामे होत होते. तर, तासभर प्रतीक्षा करून हातात दोन हजार रुपयांची नवीन नोट पडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पगार होऊनही हाती पैसा नाही
महिन्याच्या पहिल्या सप्ताहातच बँक खात्यात वेतन तसेच पेन्शनची रक्कम जमा झाल्यानंतरही ती काढता येत नसल्याने पेन्शनधारक, शासकीय कर्मचारी, तसेच औद्योगिक कर्मचाऱ्यांनी साध्या-साध्या बाबींसाठी पैसे कुठून आणावयाचे, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेने दर आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची आणि नवीन चलन खात्यात भरले असल्यास त्यावरील मर्यादा काढून घेतली असतानाही नाशिकमध्ये बँकांमधून केवळ चार हजार रुपयेच खातेदाराला दिले जात आहे. त्यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशीच परिस्थिती सध्या बघावयास मिळत आहे. नागरिकांकडेच पैसेच येत नसल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या उलाढाल थंडावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्याचेपाचशे कोटी गेले कुठे?
नाशिक जिल्ह्यास रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त रकमेपैकी शुक्रवारी सर्व बँकांकडे मिळून सुमारे ५१९ कोटी रुपये चलन उपलब्ध होते. असे असताना बँका बंद तसेच त्यांचे एटीएम बंद असताना ही रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सर्व परिस्थितीत फक्त एसबीआयचेच एटीएम सुरू असून, २१७ कोटी रुपये त्यांच्याकडे आहेत. हे चलन शहरी भागातील बँकांसाठी आहे, तर ग्रामीण भागासाठी सुमारे ३०० कोटी रुपये आहेत. नोटा बंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात १७०० कोटी रुपयांचे नवे चलन प्राप्त झाले, पैकी १४२५ कोटी रुपयांचे वितरण बँका आणि एटीएममधून झाले.

अशी हाेती स्थिती
{जिल्ह्यात एटीएमची संख्या ९०३
{ ८० टक्क्यांहून अधिक एटीएम बंद
{ सर्व बँकांकडे उपलब्ध चलन ५१९ कोटी
{ पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा
{ एसबीआय वगळता सर्व बँकांचे एटीएम बंदच
{ नाशिककरांची आजची सुटी रांगेतच
{ चलनकोंडीने बाजारपेठ थंडावली
{ पगारदारांचे झाले हाल
रिझर्व्ह बँकेत नोटा नाहीच
जिल्ह्यातील देना बँक, यूबीएफ, बँक ऑफ महाराष्ट्रसह चार बँकांना चलन उपलब्ध करून देण्यासाठी आरबीआयने डिसेंबर रोजी बोलावले होते. मात्र, त्यांना पैसेच दिले नसल्याने त्यांची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक कोंडीत भर पडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्षच
नोटाबंदीनंतर महिना उलटूनही चलनकल्लोळ कायम आहे. सुटीच्या काळात एटीएममध्ये दिवसातून दोन वेळा रोकड भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही शहरातील ८० टक्क्यांहून अधिक एटीएम बंद असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. विशेष म्हणजे नियमित व्यवहार, मासिक हप्ते, बिले भरण्यासाठीही सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे सुरुवातीला नोटाबंदीचे समर्थन करणारेही त्रस्त झाल्याने त्यांनीही बँकांच्या भोंगळ कारभारावर आणि सरकारच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...