आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणिताची प्रश्नपत्रिका इंग्रजीतून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिष्यवृत्ती परीक्षेतील गाेंधळाबाबत शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना घेराव घालत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करताना परीक्षार्थी. - Divya Marathi
शिष्यवृत्ती परीक्षेतील गाेंधळाबाबत शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना घेराव घालत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करताना परीक्षार्थी.
नाशिक - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक अर्थात पाचवी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. २६) घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व गोंधळ उडाला. शहरातील तीन केंद्रांवरील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका मिळाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना घेराव घालत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकारास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापकांसह केंद्र संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश अहिरे यांनी दिले. 
 
जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील तीन केंद्रांवर गोंधळ झाला. पेठे विद्यालयासह वाघ गुरुजी शाळेतील केंद्रांवरील सकाळच्या सत्रातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. पेठे विद्यालयाच्या केंद्रावरील १०८ विद्यार्थ्यांना गणित विषयाची प्रश्नपत्रिका मराठीऐवजी सेमी इंग्रजीमधील वाटप करण्यात आली. परीक्षेची संपूर्ण तयारी मराठी माध्यमातून केल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना मोठी अडचण झाली. विद्यार्थ्यांनी सदरचा प्रकार लक्षात आणून दिला. मात्र, मराठीच्या प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा सेमी इंग्रजीमधूनच परीक्षा द्यावी लागली. दरम्यान, पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेच्या इमारतीतच ठिय्या देत केंद्र संचालकांना जाब विचारला. केंद्र संचालक पालकांमध्ये वाद झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
 
विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत पालकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनाच केंद्रावर यावे लागले. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व प्रकाराची माहिती जाणून घेतल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना ७५ गुण द्या, नाहीतर पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत अहिरे यांना घेराव घातला. पेठेच्या या केंद्रावर बराच वेळ गोंधळ सुरू राहिल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी विलंब झाल्याने त्यांना काही वेळ वाढवून देण्यात आला. दरम्यान, पुन्हा परीक्षा घेणे शक्य नसल्याने पालकांच्या निवेदनानुसार परीक्षा परिषदेकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अहिरे यांनी या वेळी पालकांना दिले. तसेच या प्रकारास जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकांसह केंद्र संचालकांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 
 
यादीनुसार प्रश्नसंचाचे वाटप 
- शिक्षण विभागाने दिलेल्या पेठे विद्यालयातील केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या यादीनुसार माध्यमानुसारच त्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. शाळांकडून अर्ज भरताना चुका झाल्या.
-हिरामण बागुल, केंद्र संचालक 
 
पुन्हा परीक्षा घ्यावी.. 
- मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी सेमी इंग्रजीचा पेपर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना सांगूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर देताना अडचणी आल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी.
-शैला रुईकर, पालक 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ३२५ केंद्रांवर ४८ हजार ६१२ विद्यार्थी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...