आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोकेदायक ठिकाणी सहली नको, पालकांची संमती बंधनकारक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मागील वर्षी पुण्यातील एका कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमावली असलेले परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
त्यामुळे सहलींचे आयोजन करताना सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक शाळेवर बंधनकारक राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दुर्लक्ष झाल्यास किंवा पालकांकडून तक्रारी आल्यास त्यास शिक्षकांना, मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे निर्देशही पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र पार पडल्यानंतर दिवाळीनंतर द्वितीय सत्र सुरू होते. द्वितीय सत्रात दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. या वर्षीही शाळा महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक सहलींच्या आयोजनाची तयारी सुरू झाली. सहलींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने नियमावली तयार करून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांनी सर्व नियमांचे पालन करूनच सहलींचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धोकेदायक ठिकाणी सहली काढू नये, तसेच पर्यटनाऐवजी अभ्यासदौरा या उद्देशाने सहलींचे आयोजन करावे, असेही पत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे.

{ समुद्र किनारे, पर्वतांवरील ठिकाणे, नदी आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत.
{ सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत आपत्कालीन स्थिती उद््भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे.
{ सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी तसेच ज्या ठिकाणी सहल जाणार तेथील शासकीय रुग्णालये डॉक्टरांचे संपर्क क्रमांक ठेवावेत.
{ सहलीचा संपूर्ण आराखडा पालकांपर्यंत पोहोचवावा. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे.
{ सहलींसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापराव्यात.
{ शिक्षकांनी तंबाखू अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.
{ सहलीत विद्यार्थ्यांना मोबाइल फोन वापरण्याची मुभा द्यावी.
{ विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती कोणत्याही संस्थेने करू नये.
{ शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी गोळा करू नये.
{ सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असेल तर एक महिला शिक्षिका एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर नेणे बंधनकारक राहील.
{ सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
{ रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी.
{ शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई, शिस्तभंगाची कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.
{ शाळांनी या सर्व सूचनांचे पालन केले आहे का, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र घेऊन सहलीस परवानगी द्यावी. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई हाेईल.
बातम्या आणखी आहेत...