आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजार चोरीचा माल खरेदी-विक्रीने पुन्हा चर्चेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- संपूर्ण शहरात अतिक्रमणामुळे चर्चेचा विषय ठरलेला अंबड-चुंचाळे शिवारातील भंगार बाजार चोरीच्या खरेदी-विक्रीमुळे पुन्हा चर्चेत आला असून, या ठिकाणी चोरीच्या पाच लाखांच्या पाच टन वायर्स पकडण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारांबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी अंबड भंगार बाजारात ठाण्याहून चोरीचा माल विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, अंबड पोलिसांनी सापळा रचून हा संपूर्ण माल हस्तगत केला. येथील एका गुदामाला सील ठोकले आहे. काही संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिसांचे विशेष पथक या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यासाठी ठाणे येथे रवाना झाले आहे.
स्वामींनंतर धिवरेंची नियुक्ती : उपायुक्तपदी श्रीकांत धिवरे यांची बदली करण्यात आली आहे. ते डॉ. डी. एस. स्वामी यांचे सहकारी असल्याचे समजते. त्यांच्याप्रमाणे धिवरे गुन्हेगारी अवैध धंद्यांवर कारवाई करतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दिलीप दातीरांचा लढा : अनधिकृत धोकादायक असलेला हा भंगार बाजार हटवावा, यासाठी माजी सभागृह नेते दिलीप दातीर सतत लढा देत आहेत. त्यांनी याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावत जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने हा भंगार बाजार हटविण्याचा निकाल दिला आहे. मात्र, प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप दातीर यांनी केला आहे.
उपायुक्त स्वामींनंतर मोहीम थंडावली
दोन ते अडीच वर्षांपूर्वी या भंगार बाजारात तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी मिशन भंगार बाजार राबविले होते. यात सर्वच भंगार बाजारातील गैरप्रकार बाहेर काढले होते. त्यामुळे चोरट्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी अवैध धंद्यांचे पेच वाढले आहेत.
चोरट्यांची सर्रास दादागिरी
- याठिकाणी चोरट्यांची मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे. ते पोलिसांना हप्ते देतात हे उघडपणे सांगतात. त्यांची नावेही सांगतात. चोरीच्या या प्रकाराबाबत मोठी साखळी आहे. अनेकांचे आर्थिक संबंध आहेत.
ज्ञानेश्वर गायधनी, सामाजिक कार्यकर्ते
तपासासाठी पथक ठाण्याकडे
- चोरीच्या टन वायर्सची विक्री होताना पकडले आहे. पथक चौकशीसाठी ठाण्याला गेले आहे. यावर तपास करून कारवाई केली जाईल.
अतुल झेंडे, सहा.पो. आयुक्त
चोरीचा माल खरेदी-विक्रीसाठीच चर्चा
भंगार बाजार हा ‘एमआयडीसी’तील टाकाऊ माल खरेदी-विक्रीसाठी असतो. मात्र, या ठिकाणी चोरीच्या मालाचीच जास्त खरेदी-विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांना आताच माल कसा सापडला, नेहमीच असे चोरीचे प्रकार घडत असतात. मात्र, या सर्व प्रकाराला काही पोलिसांचे लागेबांधे जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काही पोलिसांचेच ‘सहकार्य’
- भंगार बाजारातील गैरप्रकाराला काही पोलिसांचे हितसंबंध कारणीभूत आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय चोरीच्या मालाची खरेदी-विक्री होऊच शकत नाही. यावर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
मनोज बोराडे, सामाजिक कार्यकर्ते