आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: चार वर्षांनंतर झाला ‘जाॅल्या’च्या खुनाचा उलगडा; ‘काेम्बिंग’ने यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - कुख्यात श्रीपाद सूर्यवंशी याची सिनेस्टाइल हत्या प्रकरणातील संशयित असलेला वाघाडीतील सराईत गुन्हेगार जालिंदर अंबादास उगलमुगले ऊर्फ ज्वाल्या याच्या हत्येचे काेडे अखेर चार वर्षांनी उकलले. घाेटी येथे चार वर्षांपूर्वी सापडलेला मृतदेह बेपत्ता असलेल्या ज्वाल्याचाच असल्याचे निष्पन्न झाले अाहे. पूर्ववैमनस्य अाणि वर्चस्ववादातून ज्वाल्याचा खून केल्याची कबुली तीन संशयितांनी दिली असून, सध्या हे संशयित पंचवटी पाेलिसांच्या ताब्यात अाहे. हा खून काेणाच्या इशाऱ्यावरून झाला याचा शाेध पाेलिस घेत अाहे. 
 
पंचवटी परिसरातील पाथरवट लेन येथे झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या संशयितांकडून या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जालिंदर अंबादास उगलमुगले ऊर्फ जॉल्या (वय २२ रा. वाघाडी) हा सराईत गुन्हेगार ऑक्टोबर २०१३ पासून पंचवटीमधून बेपत्ता होता. जॉल्याच्या बेपत्ता होण्यामागे अनेक चर्चा घडत होत्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जॉल्यावर खून, दरोडा, हाणामारी आणि खंडणीचे गंभीर गुन्हे पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. अनेक गुन्ह्यात पोलिसांत तो ‘वॉन्टेड’ होता. तो बेपत्ता झाल्याने पोलिसांचा तपास थंडावला होता. पोलिसांनी पाथरवट लेन येथे दंगल आणि दहशत पसरविण्याप्रकरणी वाघाडी परिसरात सलग सहा दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवत अाठ ते दहा दंगेखोरांना अटक केली. हत्यार जप्त केले. या संशयितांची स्वतंत्र चौकशी करत ‘खाक्या’ दाखवल्यानंतर यातील तीन संशयितांनी चार वर्षांपूर्वी जॉल्याला घोटी-सिन्नर रस्त्यावर नेऊन त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. घोटी पोलिसांत अर्धवट जळालेल्या मृतदेहाची नोंद असल्याची माहिती आणि नोंद मिळाली. या अाधारे पोलिसांना चार वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर माहिती देणे उचित ठरेल, असे पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. 
 
जॉल्या अखेर मिळाला 
पंचवटी पोलिसांना जॉल्या काही गुन्ह्यांत पाहिजे होता. मात्र तो मिळून येत नव्हता. अाॅक्टाेबर २०१३ मध्ये त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. जॉल्याचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला, तरी खून कसा आणि का आणि कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला याचा तपास सुरू केला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...