आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: उत्तरपत्रिकाच गहाळ, 85 हजार विद्यार्थ्यांना अंदाजपंचे गुणदान; मुक्त विद्यापीठाचा प्रताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठीत ३० गुण मिळवले म्हणून इंग्रजीतही ३० गुण पडले असावे, तसेच गणितात ३५ गुण आहेत मग विज्ञानातही ३५ गुण मिळू शकतील असा मोघम अंदाज बांधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने एक-दोन नव्हे तर तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
गेल्या वर्षी मुक्त विद्यापीठातर्फे परीक्षा दिलेल्या ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच सापडत नव्हत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांच्या एकाही विषयाच्या उत्तरपत्रिका मिळाल्या नाही अशा विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आल्याचे समाेर आले आहे.
 
डिजिटलायझेशनच्या दिशेने पुढे जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने जलदगतीने तपासल्या जातात. तसेच त्यात चूक नसते असे कुलगुरू इ.वायुनंदन यांनी नुकतेच सांगितले. तसेच उत्तरपत्रिका तपासणीसाठी उशीर होत असल्याने मुंबई विद्यापीठाने मुक्त विद्यापीठाची मदत मागितली अशा शब्दांतही कुलगुरूंनी परीक्षा विभागाचे कौतुक केले होते.
 
परंतु, ज्या परीक्षा विभागाचे कुलगुरूंनी गुणगान गायले त्याच विभागाने विद्यापीठामार्फत परीक्षा दिलेल्या तब्बल ८५ हजार विद्यार्थ्यांच्याच उत्तरपत्रिका गहाळ केल्याचे आता समोर आले आहे. गेल्या वर्षी मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परंतु, त्यातील ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकाच गहाळ झाल्या आहेत. तसेच या उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगसंदर्भातही कुठलीही माहिती परीक्षा विभागाकडे नाही. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ज्या विद्यार्थ्यांना एका विषयात जेवढे गुण मिळाले तेवढेच गुण दुसऱ्या विषयात देण्यात आले.
 

उत्तरपत्रिका मिळत नव्हत्या; विषय गोपनीय, त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य नाही
गेल्यावर्षीचे सर्व निकाल लागले आहेत. काही उत्तरपत्रिका मिळत नव्हत्या. त्यामुळे निकालास उशीर झाला. सरासरी गुण देण्यासाठी परीक्षा मंडळाची मंजुरी लागते. त्यानंतर परीक्षार्थींना सरासरी गुण दिले जातात. हा गोपनीय विषय अाहे. यावर अधिक बोलणे योग्य नाही.
- अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
 
परीक्षा दिलेलेही उत्तीर्ण; हुशार मागे, सामान्य पुढे
निकाल लागत नसल्याने ८५ हजार विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी आक्षेप घेत विद्यापीठाकडे विचारणा केली. त्यानंतर परीक्षा विभागाने सरासरी गुण देऊन निकाल देण्याचा निर्णय घेतला. परंतु, सरासरी गुण देताना काही हुशार विद्यार्थ्यांना कमी तर काही सामान्य गुणवत्ता असलेल्यांना जास्त गुण मिळाल्याच्याही तक्रारी आल्या. तसेच या गोंधळात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली नाही ते ही उत्तीर्ण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...