आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम 2 वर्षांत बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम दाेन वर्षांत टप्प्याटप्याने बदलण्यात येणार आहे. जून २०१७ पासून सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार आहेत. याचबराेबर जून २०१८ पासून ८ वी व १० वीची सर्व पुस्तके बदलणार आहेत. इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचे २०१७ हे शेवटचे वर्ष राहणार आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.   

गेल्या वर्षापासून सुुरू असलेली इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाच्या बदलाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली अाहे. इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. बालभारतीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात जून २०१७ पासून सातवी व नववीची सर्व पुस्तके बदलणार आहेत. जून २०१८ पासून आठवी व दहावीची पुस्तके बदलण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. या वर्गांच्या पुस्तकांसाठी २०१७ हे शेवटचे वर्ष राहणार आहे. नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला होता. या मसुद्यावर तक्रारी तसेच सूचना नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबर ही मुदतही देण्यात आली होती. नव्या मसुद्यात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आता अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जून महिन्यापासून अभ्यासक्रमात पूर्णपणे बदल होणार असून सर्व पुस्तके बदलणार आहेत.
 
नवीन अभ्यासक्रमही संकेतस्थळावर
इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे नवीन आराखडे, त्यांची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम बदल अशी विविध माहिती बालभारतीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या प्रमुख विषयांसह द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांच्या अभ्यासक्रमाचे आराखडेही बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.