आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : पाथर्डी शिवारात एकाच रात्री 6 ठिकाणी घरफाेडी, लाखोंची चोरी; पोलिसांची गस्त कागदोपत्रीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी शिवारातील म्हाडाच्या याच इमारतीतील चार फ्लॅट चाेरांनी फाेडले. - Divya Marathi
पाथर्डी शिवारातील म्हाडाच्या याच इमारतीतील चार फ्लॅट चाेरांनी फाेडले.
इंदिरानगर - पाथर्डी शिवारात एकाच रात्री चार फ्लॅट, एक बंगला किराणा दुकान चाेरट्यांनी फाेडले. ही बाब मंगळवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांच्या टोळीने लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
 
इंदिरानगर भागातील पाथर्डी शिवारातील स्वराज्यनगर येथील अंजना लॉन्सच्या पाठीमागे म्हाडाच्या इमारतीतील चार फ्लॅट, एक बंगला अाणि राजश्री किराणा दुकान चाेरट्यांनी सोमवारी (दि. ७) रात्री फाेडले. एकाच रात्रीत इतक्या झालेल्या या घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे. सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे येथील बरेचसे रहिवासी बाहेरगावी गेले हाेते. याचाच फायदा घेत एका रात्रीतून इतक्या मोठ्या प्रमाणात या घरफोड्या करण्यात आल्याची घटना घडली. ज्या सहा ठिकाणी घरफाेड्या झाल्या तेथील घरे बंद हाेती. घरफोडी सुरू असताना चोरांनी त्या घरालगतच्या घरांच्या कड्या बाहेरून लावल्या हाेत्या. मंगळवारी (दि. ८) सकाळी बाहेरून दरवाजे उघडल्यानंतर परिसरात घरफोड्या झाल्याचे समोर आले. त्याचबरोबर परिसरातील एका बंगल्याची खिडकी तोडून आत प्रवेश करून साहित्य चोरून नेले. तसेच राजश्री किराणा दुकानाच्या गल्ल्यातील १५ हजार रुपयांची रक्कम माल असा ३४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार दुकान मालक दीपक नवले यांनी पोलिस ठाण्यात दिली. आजूबाजूच्या शुक्रतारा अपार्टमेंट, ओमकारेश्वर सोसायटी, चंद्रमोळी सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कडी लावत चोरी केली शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनिता उन्हवणे ह्या रक्षाबंधनासाठी माहेरी गेल्या असता त्यांच्या फ्लॅट कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी लांबवली. याप्रकरणी इंदिरानगर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली अाहे. एकाच रात्री सहा ठिकाणी घरफाेडीचा प्रकार घडल्याने या परिसरातील नागरिक भयभीत अाहेत. 
 
पोलिसांची गस्त कागदोपत्रीच 
परिसरात पोलिसांकडून अद्यापही गस्त घालण्यात येत नाही. गस्त फक्त कागदोपत्रीच केली जात असल्यामुळे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चोरट्यांवर पोलिसांचा अजिबातच वचक राहिलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेणे गरजेचे झाले आहे. या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...