आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पाेलिसांची ‘डाेईजड’ कारवाई...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेटसक्ती केली आहे. या आदेशाची नाशिक शहरातही पोलिस आयुक्तांनी कठाेर अंमलबजावणी सुरू केली अाहे. विशेष म्हणजे, पोलिस विभागापासूनच अायुक्तांनी या अादेशाची अंमलबजावणी करत प्रथम पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले. हेल्मेट नसल्यास कार्यालयात प्रवेश देण्याइतपत स्वागतार्ह कारवाई अायुक्तांकडून हाेत अाहे. त्याचबराेबर हेल्मेट वापरासंदर्भात नागरिकांना आवाहनही केले जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या वतीने सर्रास दमदाटी करून सक्तीची दंडवसुली सुरू असल्याबाबत तक्रारी येत अाहेत.
काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे अायुक्तांच्या या महत्त्वपूर्ण माेहिमेला गालबाेट लागल्याचे दिसून येत अाहे. याबाबत वाहनधारकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी.बी. स्टार’ने संबंधित ठिकाणांवर पाहणी केली असता विनाहेल्मेट दुचाकीचालकांना थांबवून त्यांना सक्तीने पावती फाडण्यास सांगितले जात असल्याचे शुल्क देण्यास विराेध करणाऱ्यांची वाहने टाेइंग करून जमा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून अाला. अशा स्थितीत वाहनचालकांना हेल्मेट नसल्याचा ५०० रुपये दंड आणि वाहन टाेइंग केल्यानंतर २७० रुपये दंड अाणि एकूणच वाहन साेडविण्यासाठीची तास दाेन तासांची धडपड असा सर्व मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत हाेते. हेल्मेटसक्तीचा निर्णय चांगला असला, तरी पोलिसांकडून हाेत असलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे गैरवर्तणुकीमुळे काही वाहनचालकांनी ‘डी.बी. स्टार’कडे नाराजी व्यक्त केली आहे.

टोइंगचे पैसे लागणार..
^विनाहेल्मेट असल्यास ५०० रुपये दंडाची कारवाई सुरू अाहे. पैसे दिल्यास वाहन टोइंग केली जात आहेत. त्यांना टोइंगचे पैसे द्यावेच लागणार आहेत. -आनंद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका पोलिस ठाणे

पार्किंगमध्येही दंड!
^मुंबईनाकापरिसरात कामानिमित्त आलो असता पार्किंगमध्ये लावलेले वाहनही नेले. हेल्मेट, कागदपत्रे असतानाही २७० रुपये द्यावे लागले. शिवाय त्रास वेगळाच. -उमेश चौधरी, वाहनचालक

पद्धतच चुकीची...
^हेल्मेटनसल्याने वाहन थांबवून ते बाजूला पार्क करण्यास सांगितले जात हाेते. मात्र, टोइंगवाले लागलीच वाहन घेऊन जात हाेते. ही पद्धत अत्यंत चुकीची अाहे. -रवींद्र ठाकूर

टोइंगचे२७० का द्यावे?
^हेल्मेट नसल्यामुळे ५०० रुपये दंड ठीक अाहे. मात्र, वाहन टोइंग करणाऱ्यांचे २७० रुपये अाम्ही का द्यायचे. ही तर सक्तीची अन‌् अतिरिक्त वसुलीच म्हणावी लागेल. -आकाश ठाकरे

५००ची नोट घेतली नाही
^हेल्मेट नव्हते,मात्र खिशात ५०० ची नाेट हाेती. दंड भरण्यासाठी ही नाेट देऊ केली. मात्र, नकार दिला गेला. शंभरच्या तीनच नाेटा हाेत्या. त्यामुळे प्रचंड गैरसाेय झाली. -वैभव कदम

पाचशेची नोट घेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार
मुंबई नाका परिसरात सुरू असलेल्या कारवाईत काही वाहनचालकांनी दंडाची रक्कम म्हणून जुनी पाचशेची नोट देऊ केली. मात्र, या नोटा घेण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिल्याने अनेकांना वाहन त्याच ठिकाणी सोडून बँकेत पैसे काढण्यासाठी जावे लागले. मात्र, बँकेतून पैसे काढून परत आल्यानंतर वाहन वाहतूक शाखेच्या कार्यालयात टाेइंग करून नेल्याची माहिती मिळाली.

नियमावलीच्या अर्थाचे असेही ‘अर्थकारण’...
वास्तविक वाहतूक शिस्तीचे पालन, नियंत्रण आणि नियमानुसार वाहतूक ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. वाहनधारकांना धाक बसावा, शिस्त लागावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद अाहे. शिस्तीसाठी दंड असून या नियमावलीच्या अर्थाचा वेगळाच अर्थ लावून शासनाच्या तिजोरीत महसूल वाढवण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी व्यक्त केल्या.

पार्किंगमधूनही वाहने उचलण्याची दबंगगिरी..
मुंबई नाका परिसरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाईसह टाेइंगचीही कारवाई सुरू हाेती. येथील एका इमारतीत पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना टाेइंग केले जात असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसूून अाले. या वाहनचालकांकडे हेल्मेट सर्व कागदपत्रे असतानाही त्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या सक्त भूमिकेमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी त्यांनी ‘डी.बी. स्टार’कडे व्यक्त केल्या. या वाहनधारकांना २७० रुपये भरून अापली वाहने परत मिळवावी लागली.

पोलिस-वाहनचालकांमध्ये वारंवार सुरू हाेते वाद...
कारवाईत अडवलेल्या विनाहेल्मेट वाहनचालकांसाेबत पाेलिस अधिकाऱ्यांचे वारंवार वाद सुरू हाेते. लगेचच पावती फाडा अन्यथा वाहन टाेइंग करू, असे सांगण्यात येत असल्याने जुन्या नाेटा, धनादेश, कार्ड स्वीकारले जात नसल्याने वाहनधारकांना पाेलिसांकडून चांगलेच वेठीस धरले जात हाेते.

मुंबई नाका परिसरात वाहतूक पोलिसांमार्फत दुचाकी वाहनांना अडवून त्यांच्या वाहने रस्त्याच्या बाजूला उभी केली जात हाेती. यानंतर संबंधित वाहनधारकाला हेल्मेट घातल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड भरण्याचा अाग्रह केला जात हाेता. बहुतांश वाहनचालकांनी ताे मान्यही केला, मात्र पाेलिसांकडील स्वाइप मशिनवर ठराविक कार्डच चालत हाेते. तसेच जुन्या नाेटा घेतल्या जात नव्हत्या, धनादेश देण्याचीही तयारी काही वाहनचालकांनी दर्शवली मात्र त्यासही नकार दिला गेला. त्यामुळे वाहनधारक अाणि पाेलिस कर्मचाऱ्यांत वारंवार प्रचंड वाद हाेताना दिसून अाले. विशेष म्हणजे, जवळच उभ्या या वाहनांना टाेइंग केले जात असल्याने पुन्हा दुसऱ्या जाचाला वाहनधारकांना सामाेरे जावे लागत हाेते. हेल्मेटचे ५००, तर टाेइंगचे २७० रुपये वाहनधारकांना माेजावे लागत हाेते.

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: काेरडे पाषाण’
पोलिस आयुक्तांनी सर्वप्रथम पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले असताना अनेक पोलिस कर्मचारी मात्र हेल्मेट वापरताच वाहन चालविताना अनेक ठिकाणी दिसून अाले. सामान्य नागरिकांवर कठाेरात कठाेर कारवाई हाेत असताना अशा पोलिस अधिकारी वा कर्मचाऱ्यांना मात्र सूट दिली जात असताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त हाेत हाेत्या.

शुल्कासाठी हे पर्यायही हाेते शक्य...
पाेलिसांनाडेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे पैसे घेणे शक्य हाेते. शिवाय धनादेशाद्वारेही पैसे स्वीकारता अाले असते. मुख्य म्हणजे, न्यायालयामार्फतही वाहनधारकांकडून शुल्कवसुलीचा पर्याय हाेता. परंतु, तसे करता अडवणुकीचे धाेरण ठेवत संबंधित पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना वेठीस धरले हाेते.

टाेइंगचा अजब ‘फंडा’
मुंबईनाका परिसरात सकाळपासून दहा ते पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना अडवून ती बाजूलाच उभी करण्याच्या सूचना केल्या जात हाेत्या. १० ते १५ मिनिटांतच त्याठिकाणी टाेइंग व्हॅन येऊन ही वाहने उचलून नेली जात हाेती. याबाबत काही वाहनचालकांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ‘तुम्हाला अाता विनाहेल्मेटच्या दंडाबराेबरच टाेइंगचे २७० रुपये देऊन अापले वाहन साेडवून अाणावे लागेल’ असे सांगण्यात येत हाेते. यामुळे वाहनधारक चांगलेच हैराण झाले हाेते.
काय अाढळले ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत..?
अशाच प्रकारे कारवाई गरजेची
एकीकडे नाेटाबंदीनंतर पुरते मेटाकुटीला अालेले नागरिक पै अन‌् पै खर्चासाठी विचार करीत असताना पाेलिस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून मात्र हेल्मेटसक्तीच्या नावाखाली तब्बल पाचशे ते अाठशे रुपये उकळले जात असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अालेे. पाेलिस अायुक्त सिंघल यांनी हेल्मेटसक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वाहनचालकांचे प्रबाेधन करून दंडात्मक कारवाईचे अादेशही दिले अाहेत. मात्र, या अादेशाला संधी मानून वाहनचालकांना दमदाटी करून, त्यांची वाहने टाेइंगद्वारे जमा करून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करणाऱ्या काही पाेलिस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे वाहनचालक वेठीस धरले जात अाहेत. विशेष म्हणजे, अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांसह महिलांनादेखील संबंधित अधिकाऱ्यांच्या जाचाचा सामना करावा लागला. काही व्यक्तींनी जुनी नाेट देऊ केली, काहींनी धनादेश दिले, मात्र ते स्पष्टपणे नाकारण्यात अाले. स्वाइप मशिनवरही ठराविक कार्डच स्वीकारले जात असल्याचे सांगितले गेल्याने अनेकांना अापली वाहने टाेइंग हाेताना पाहण्यापलीकडे पर्याय नव्हता. या शुल्कवसुलीवर हा प्रकाशझाेत...
स्वाइप मशिन फक्त देखाव्यापुरतेच; धनादेश घेण्यासही नकार
वाहनधारकांशी उद्धट वर्तन; राेख रक्कम अाणि नवीन नाेटांचीच मागणी
दंड भरण्यास विलंब केल्यास थेट वाहन टाेइंग करून घेण्याची घाई
हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांकडून सक्तीने ५०० रुपयांची वसुली
पाेलिस अायुक्तांच्या उत्तम अन‌् अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमाला सक्तीच्या वसुलीमुळे गालबाेट; शहरात ठिकठिकाणी वाहनधारक वेठीस
विजय पाटील, पोलिसउपआयुक्त
{ हेल्मेटसक्तीची मोहीम कशा पद्धतीने राबवित आहात?
-विनाहेल्मेट वाहनधारकांना आधी समज देऊन त्यांचे प्रबोधन केले जात आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
{मुंबई नाका येथे हेल्मेटचा दंड तर केला जात हाेता, मात्र त्यांची वाहने टोइंग करून दुहेरी दंड वसूल केला जात हाेता. याबाबत काय सांगाल?
-जागेवरच दंड दिल्यास वाहन टोइंग करून कार्यालयात पाठविले जाते. त्यानंतर हेल्मेट नसल्याचा आणि टोइंगचा दंड वसूल करताे.
{स्वाइप कार्ड मशीनही ठराविक कार्डच स्वीकारत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनचालक आणि पोलिसांत वाद होत आहेत, त्याचे काय?
-स्टेट बँकेकडूनच स्वाइप कार्ड मशिन देण्यात आले आहे. यात सर्व कार्ड चालतात. कारवाई दरम्यान तांत्रिक बिगाड आला असावा.
बातम्या आणखी आहेत...