आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभस्नानाची शाही सांगता, लाखो भाविकांच्या साक्षीने त्र्यंबकला अखेरची पर्वणी निर्विघ्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष, साधू-संतांचा जयजयकार व भाविकांच्या अलोट गर्दीत शुक्रवारी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात तिसऱ्या आणि अखेरच्या शाही स्नानाने या अनुपम सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, बहुसंख्य भाविकांनी नाशिकच्या रामकुंडातही स्नान केले.

नीलपर्वताच्या पायथ्यापासून पहाटे शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी उत्तररात्री श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या महंतांनी प्रथम कुशावर्ताकडे प्रस्थान केले होते. निशाण, ध्वज आणि शस्त्रास्त्र आणि सर्वप्रथम गुरुस्नान हे प्रत्येकच आखाड्याचे वैशिष्ट्य होते. पण नागा साधूंच्या अस्त्र प्रात्यक्षिकांसह त्यांना पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. शाही मिरवणूक मार्ग अंतर फार नसल्याने मिरवणूक शीघ्रतेने पुढे सरकत होती. लगेचच पंचदशनाम आवाहन आखाड्याच्या महंताचे अागमन झाले आणि त्यांनी शिवशंभूच्या केलेल्या जयघोषांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला. पंचायती अग्नी आखाड्याच्या महंत, शिष्यांनीही नृत्य करत कुशावर्त गाठून शाही स्नान केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. सकाळी आखाड्यांचे महंत कुशावर्तावर येताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंचायती आनंद, पंचायती महानिर्वाणी, पंचायती अटल आखाड्याचे उत्साहात स्नान झाले. हे आखाडे शाही मार्गावरील मिरवणुकीत शिस्तबद्धतेने सहभागी झाले होते. भाविकांचे लक्ष होते ते बडा उदासीन आखाड्याकडे. कुशावर्ताच्या मागच्या बाजूने या आखाड्याचे आगमन होताच भाविकांनी एकच जल्लोष केला. त्याच्यापाठोपाठच नया उदासीन आखाडा आणि पंचायती निर्मल आखाड्याच्या महंत, शिष्यांनी तीर्थस्नान केले. दुपारी बारा वाजेनंतर भाविकांसाठी कुशावर्त खुले करण्यात आले होते.
नागा साधूंच्या दर्शनास जमली तोबा गर्दी
त्र्यंबकेश्वरी सर्व आखाडे हे शैव पंथीयांचे आहेत. यातील अनेक अाखाड्यांत नागा साधू असतात. हे साधू अंगावर भस्म लावून, विवस्त्र शाही मिरवणुकीत सहभागी झाले हाेते. अस्त्रशस्त्रांची अनेक साहसी प्रात्यक्षिकेही त्यांनी करून दाखवली. साधूंचे हे वेगळे रूप बघण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली हाेती.
गाड्यांअभावी संतप्त भाविकांचा रास्ता रोको
या सोहळ्यात वाहतुकीच्या नियोजनाचा मात्र बोजवारा उडाला. त्र्यंबककडे जाणाऱ्या रिकाम्या बसदेखील थांबत नसल्याने संतापलेल्या भाविकांनी खंबाळे वाहनतळाच्या बाहेरच रास्ता रोको केला. त्यामुळे ३० ते ५० बसेस ठप्प झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. मात्र नंतर काहींना बसने जाण्याची संधी मिळाली.

कुंडात ३६ नद्यांचे जल
विश्वशांती केंद्रातर्फे जगाला शांतीचा संदेश देत केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, अयोध्या, काशी, बनारस, पुष्कर, बोधगया, कैलास मानसरोवर, मक्का-मदिना, व्हॅटिकन सिटी, रोम आदी ठिकाणांहून अाणण्यात आलेले ३६ पवित्र नद्यांचे जल शुक्रवारी नाशिकच्या रामकुंडात अर्पण करण्यात आले.