आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरीही, समाजाच्या तळागाळातील लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय विभागांनी त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. लाभार्थींना या योजनांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी अधिकाऱ्यांना केले.
विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या जिल्हा अभ्यास दौऱ्यात सानप यांच्यासह समितीच्या सदस्यांनी योजनांचा आढावा घेतला. पहिल्या दिवशी समितीने जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या दौऱ्याला जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीने प्रारंभ झाला.
जिल्हा परिषदेतील बैठकीत समितीने कल्याणकारी योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबतची स्पष्ट सूचना आमदार सानप यांनी या वेळी केली. जिल्हा परिषदेच्या भटके-विमुक्त जातीच्या पदाबाबतच्या बिंदूनामावलीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यार्थी शिष्यवृती वाटप, शैक्षणिक या बाबतच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
या बैठकीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाबाबत समितीच्या सदस्यांनी बँकेच्या संचालक मंडळाबरोबर बैठक घेऊन बँकेमार्फत करण्यात आलेले कर्जाचे वाटप, लाभार्थींच्या प्रलंबित प्रकरणांसह कामकाजाबाबतचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे समितीच्या सदस्यांनी विविध प्रश्नांबाबत भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक शुल्क यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. या समितीचे प्रमुख आमदार बाळासाहेब सानप, आमदार सुधाकर कोहळे, प्रभुदास भिलावेकर, सुरेश धानोरकर, रामराव वडकुते, हरिसिंग राठोड या दौऱ्यात सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना बजावली नोटीस
जिल्हापरिषदेतील आढाव्यासाठी आलेल्या समितीतील सदस्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्याचे आदेश दिले. विधीमंडळाची समिती दोन दिवसीय दौऱ्यावर असून, समितीचे अध्यक्ष तथा आमदार सानप यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यावेळी शिक्षकांच्या रिक्त पदांसंदर्भातील बिंदुनियमावली तसेच, भटक्या जाती विमुक्त जमातीसाठी आलेला निधी योजनेबाबतही प्रश्न विचारण्यात आले.
मात्र त्याची माहिती देता आल्यामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आल्याचे समजते. या वेळी समिती सदस्यांबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...