आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपले सरकार’मुळे घरातच मिळणार दाखले,सर्वसामान्य नागरिकांचा कार्यालयात येण्याचा वेळ वाचणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘आपले सरकार’ पोर्टलवर आपल्या खात्याची नोंदणी केल्याानंतर कुठल्याही नागरिकाला घरबसल्या कुठल्याही दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय दाखले वितरणही ऑनलाइन असल्याने या अर्जाला अनुसरून सर्वच प्रक्रिया ऑनलाइन पार पडत दाखलाही ऑनलाइनच मिळणार आहे. त्यामुळे आता विविध शासकीय दाखल्यांसाठी सेतू किंवा महा-इ-सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. 
 
शैक्षणिकसह इतर कामांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांना पूर्वी थेट जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयातच जावे लागत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता. शिवाय आल्यानंतर लगेच दाखला मिळेल याचीही शाश्वती नव्हती. त्यामुळे रिकाम्या हातीच परतावे लागल्यानंतर येण्या-जाण्याचा खर्चही वाया जात होता. त्यावर शासनाने सेतूची संकल्पना राबविली. परंतु, यासाठी तहसीलदार कार्यालय आणि शहरातील विविध भागांत जावेच लागत होते. त्यावरही महा-इ-सेवा केंद्र शासनाने सुरू केले. 
 
परंतु, आता थेट आपले सरकार हे पोर्टल शासनाने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर केवळ तुमचे खाते नोंदविल्यास त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड कायम सोबत ठेवावा लागेल. यात तुमचा आधारसह मोबाइल नंबर आणि इतर अत्यावश्यक वैयक्तिक माहिती सादर करावी लागेल. त्यात आवश्यक असलेल्या दाखल्याचा ऑनलाइन अर्ज आपल्या माहितीसह सादर करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून त्यासोबत अपलोड केल्यानंतर संपूर्ण प्रकरण तुम्हाला दाखल्यासाठी सादर करता येईल. हा अर्ज आपोआप तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत सबमीट होईल. त्यावर संबंधित शासकीय यंत्रणेकडून लागलीच कार्यवाही केली जाईल. कागदपत्राची पूर्तता झाली असल्यास वेळेत दाखला मिळू शकेल. परंतु अपूर्ण कागदपत्रे पुन्हा सादर केल्यानंतरच तुम्हाला दाखला मिळेल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु, ही सर्वच प्रक्रिया तुमच्या मोबाइलवरून किंवा घरातील संगणकावरूनही करता येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास मिटणार आहे. 
 
कार्यालयात येण्याचीगरज नाही 
-‘आपले सरकार’पोर्टलवरून जवळपास ३७२ शासकीय सेवा दिल्या जाणार आहे. त्यात महसुली १६ सुविधांचा समावेश आहे. हे सर्व तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाइलवरून करता येईल. त्यासाठी शासकीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. -डॉ.शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी, प्रशासन 
बातम्या आणखी आहेत...