आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबडच्या खाणीत टाकले जाते धाेकादायक रसायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - अंबड औद्योगिक वसाहतीतील खाण क्रमांक १४ येथे कंपनीतील धोकादायक अॅसिडयुक्त रसायन टाकण्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. अतिशय ज्वलनशील आरोग्यास धोकादायक असलेले रसायन चक्क उघड्यावर टाकले जात होते. रात्री-अपरात्री ट्रकमधून ड्रम भरून हजारो लिटर रसायन येथे आणून ओतले जात होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केली असता नगरसेवक राकेश दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रसायन टाकणाऱ्यांनी पळ काढला. 
 
अंबड औद्योगिक वसाहतीत शांतीनगर वसाहतीमागील बाजूस खाण क्रमांक १४ आहे. या ठिकाणी अवैध पद्धतीने डोंगर फोडण्याचे काम केले जायचे. यावर प्रशासनने बंदी आणल्यानंतर या ठिकाणी अवैध प्रकार सुरु झाले आहेत. या ठिकाणी गुंडाराज सुरु असल्याने कुणीही सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही. याचाच गैरफायदा घेत स्थानिक गुंडांच्या मदतीने रसायनाची विल्हेवाट लावण्याचा गैरप्रकार सुरू झाला अाहे. गुरुवारी (दि. १५) सकाळी या ठिकाणी ट्रकमधून (एमएच ०४ बीयू ४२५४) अाणलेल्या ड्रममधील अॅसिडयुक्त रसायन या खाणीत ओतले जात होते. या रसायनाची प्रचंड दुर्गंधी येत होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक राकेश दोंदे यांना कळविले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. त्यांनी तत्काळ पोलिस, पर्यावरण विभाग प्रशासनाला याबाबत माहिती दिली. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोहर भावनाथ, राहुल आरोटे, मधुकर काळे, नारायण राऊत, अरुण जाधव, राहुल राऊत, विनायक राऊत, सनी बोरकर, प्रवीण आहिरे, भूषण पाटील, तानाजी राव, अप्पा मांडे, सुभाष गाडेकर आदी उपस्थित होते. या प्रकाराबाबत पर्यावरण अधिकारी पोलीसांशी बोलायचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

परजिल्ह्यातून येते शहरात धोकादायक रसायन 
याबाबतमाहिती घेतली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. ठाणे जिल्हातील पालघर येथून हे रसायन आणले जाते. या एका ट्रकमधील रसायनाची किंमत लाख २२ हजार ३६८ इतकी असून ते नष्ट करण्यासाठी भोईसर येथील एका कंपनीला ठेका देण्यात अाला अाहे. नियमानुसार हे केमिकल नष्ट करण्यासाठी खुल्या जागेचा वापर करता येत नाही. शिवाय त्यास शासनाची परवानगी नाही. त्यामुळे नाशिक शहरातील काही टोळक्यांच्या मदतीने ते शहरात आणून खाणीत नष्ट केले जात असल्याचे बाेलले जात अाहे. 

पोलिसांमध्ये हद्दीबाबत संभ्रम 
याठिकाणी उशिरा दाखल झालेले पाेलिस हद्दीबाबत संभ्रमित होते. अंबड पोलीस तालुका पोलिस यांनाच हद्द कुणाची हे माहीत नव्हते. जर हद्द अंबड पोलिसांची नसेल तर या ट्रक औद्योगिक वसाहतीतील रस्त्यानेच खाणीत येतात आणि तालुका पोलिसांची हद्द नसेल तर त्यांच्या हद्दीत असे प्रकार सुरु असल्याबाबत त्यरांना माहिती नसावी? हा प्रकार शहर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अतिशय धोकादायक आहे. याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केल. 

बेडूक इतर प्राणी मृत्यू पावले 
या रसायनामुळे अनेक बेडूक येथे मृतावस्थेत पडल्याचे याठिकाणी अाढळले. ही खाण डोंगरावर असल्याने येथे टाकलेल्या रसायनाचा धोका शांतीनगर, बजरंगवाडी विल्होळीतील नागरिकांपर्यंत पोहचू शकतो. जमिनीत झिरपलेले रसायन शेतीसाठी धोकादायक असून विहिरीतील पाणी पिण्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

फौजदारी गुन्हे दाखल करा 
^शहरात अशाप्रकारे धोकादायक अॅसिडयुक्त रसायन आणून टाकले जाते. आम्ही या टोळीचा पर्दापाश केला. ही जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाच्या नजरेत ही बाब आणून दिली. याबाबत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. -राकेश दोंदे, नगरसेवक. 
 
बातम्या आणखी आहेत...