आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांसाठी देणार इ-पाेर्टल सुविधा- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटांच्या महिलांना अाश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात अालेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी इ-पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बचतगटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्री केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित विभागातील महिला स्वयंसहायता बचत समूहांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव तसेच विभागीय महिला मेळाव्याच्या उद‌्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

 कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे आदी उपस्थित होते.
 
यावेळी मुंडे म्हणाल्या, प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होते आणि त्याचा फायदा बचतगटातील सदस्यांना होतो. बचतगटांद्वारे अनेक चांगली उत्पादने केली जातात. अशा उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 
 
ऑनलाइन विक्री प्रक्रिया ‘आपले सरकार’ वेब पोर्टलला जोडून बचतगटांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लता बुंगे, शांता जगताप, जयश्री माळी, नूतन सूर्यवंशी, उज्ज्वला पवार, पूनम जगताप यांचा ग्रामविकासमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
तसेच स्तनदा माता सिंधुकला बेंडकुळे यांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत बुडालेल्या मजुरी लाभाचा धनादेश आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत वैष्णवी घुंबरे यांना आर्थिक लाभाचा धनादेश देण्यात आला. चांगली कामगिरी करणाऱ्या बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात संतोषीमाता बचतगट (गोलदरी, ता. त्र्यंबकेश्वर), संतोषीमाता बचतगट (बोर्डीपाडा, ता. पेठ), जय तुळजाभवानी महिला बचतगट (गंगावऱ्हे सावरगाव, ता. नाशिक) आणि संजीवनी महिला बचतगट (खडकेद, ता. इगतपुरी) आदींचा गौरव करण्यात आला. 
 
 
देना बँक देवळा शाखेतर्फे एकाच दिवशी २४ महिला बचतगटांना १.५ लाख याप्रमाणे ३४ लाखांचा पतपुरवठा करण्यात आला. त्याचे पिंपळगाव येथील एकलव्य बचतगटाला कर्जमंजुरी आदेशाचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्या हस्ते बचतगट प्रदर्शनाचे उद‌्घाटन करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली. प्रदर्शनात २५० स्टॉल्स असून ५०० महिलांचा सहभाग आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी.... 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...