आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला मतदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, महिला उमेदवारांनी दिले आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - झेरॉक्स नगरसेविका हा ठपका पुसून महिलांच्या प्रश्नांवर सक्षमपणे कारभार करण्याची ग्वाही या निवडणुकीत उतरलेल्या सर्वपक्षीय महिला उमेदवारांनी दिली. ‘दिव्य मराठी’तर्फे निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने सुरू असलेल्या ‘ती’ची निवडणूक अंतर्गत आयोजित ‘महिलानामा’ या कार्यक्रमात या नाशिकमधील सर्व पक्षांच्या तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवार पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आल्या होत्या. 
 
शहरातील महिला मतदारांनी मांडलेल्या कळीच्या मुद्द्यांबाबत त्या त्यांच्या प्रभागात काय कामे करणार, तसेच त्यांचे पक्ष या प्रश्नांबाबत काय भूमिका निभावणार, हे यावेळी मांडण्यात आले.
 
 
महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के महिला नगरसेविका निवडून जातात. त्यासाठी ६० टक्क्यांहून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शहरातील ५० टक्के महिला मतदार पुढील पाच वर्षांसाठी नाशिकच्या विकासाच्या चाव्या कोणाच्या हाती द्यायच्या हे ठरविणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून नाशिकमधील महिला मतदारांच्या सूचना आणि अपेक्षा संकलित करण्यात आल्या.
 
 आपल्या प्रभागातील कोणते प्रश्न सुटावेत, आपले नगरसेवक कसे असावेत, नगरसेविकांनी कसे काम करावे, याबाबत महिला मतदारांनी अत्यंत ठोस स्वरूपाच्या अपेक्षा आणि मुद्दे व्यक्त केले. त्यात महिलांच्या सक्रिय सहभागासाठी महिलासभा, महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशी स्वच्छतागृहे, महिलांसाठी व्यायामशाळा, जिम किंवा योगवर्ग, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महिला मार्केट हे पाच विषय सर्वाधिक महिलांकडून पुढे आले. 
 
महिला मतदारांचे हे कळीचे विषय या मेळाव्यात सर्व उमेदवारांसमोर ठेवण्यात आले आणि त्या निवडून आल्यास त्यांच्या प्रभागात या प्रश्नांवर काय करणार हे त्यांना विचारण्यात आले. त्यानुसार, महिलांसाठी ग्रीन युरिनर्ल्स, महिला कमिटी, मनोरंजन आणि समुपदेशन केंद्र, मध्यवर्ती ठिकाणी महिला मार्केट यासारख्या अभिनव कल्पना आणि योजना महिला उमेदवारांनी मांडल्या. 
 
सर्व पक्षांच्या महिला आघाड्यांच्या शहराध्यक्षाही या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. महिला मतदारांनी उपस्थित केलेल्या प्राधान्याच्या प्रश्नांवर राजकीय पक्षांची काय भूमिका असणार, आणि आगामी पंचवार्षिकमध्ये काय कार्यक्रम असणार, याबाबत महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वत्सला खैरे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, माकपच्या सेक्रेटरी अॅड. वसुधा कराड, भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रोहिणी नायडू, बसपच्या सुजाता काळे आणि मनसेच्या महिला आघाडी अध्यक्षा रिना सोनार यांनी त्यांच्या पक्षाच्या भूमिका मांडल्या. 

‘दिव्य मराठी’तर्फे ‘ती’ची निवडणूक उपक्रमांतर्गत रविवारी अायाेजित करण्यात अालेल्या ‘महिलानामा’ या कार्यक्रमास उपस्थित महापालिका निवडणुकीतील सर्वपक्षीय महिला उमेदवार. 
बातम्या आणखी आहेत...