आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थेट बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी, एसटीच्या उत्पन्नाला ५० टक्क्यांनी कात्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या कित्येक वर्षांपासून ताेट्याच्याच मार्गावर धावत असलेल्या एसटीपुढे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून हाेणारी प्रवाशांची पळवापळवी माेठी डाेकेदुखी बनली अाहे. थेट बसस्थानकात शिरून प्रवासी पळविले जात असल्याने एसटीच्या तोट्यात अाता तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समाेर अाली अाहे.
मुख्य म्हणजे, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर उभे राहण्याचे अादेश असताना वाहतूक विभागाचे हे नियम पायदळी तुडवत सर्रासपणे थेट बसस्थानकांत रिक्षा वा टॅक्सी प्रवासी घेण्यासाठी घुसखाेरी करीत असल्याचे चित्र ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी अधिकृत रिक्षा थांबा असतानाही काही मुजाेर रिक्षा, टॅक्सी चालक थेट बसस्थानकात उभे राहतात. त्यांना हटकल्यास मारहाण तसेच शिवीगाळही केली जात असल्याच्या प्रकारामुळे बसस्थानकातील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांतही भीती असल्याचे दिसून अाले अाहे. हे सर्व घडत असताना वाहतूक पाेलिस विभाग मात्र याकडे साेयीस्करपणे दुर्लक्षच करीत असल्याने समस्या अधिक गंभीर बनली अाहे.

एसटीच्या चालक-वाहकांना मारहाण करण्यापर्यंत धारिष्ट्य
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.३० वाजता तीन रेल्वे येतात. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी हाेत असते. याचाच फायदा घेत काही रिक्षाचालकांकडून बसेसला लागूनच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यातून अनेकदा रिक्षाला धक्का लागला, प्रवासी पळविताना हटकले अशा अनेक कारणांवरून रिक्षाचालक एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होऊन थेट चालक-वाहकांना मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून अाले अाहे. विशेष म्हणजे, असे प्रकार राेखण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र, हे सीसीटीव्ही केवळ शोभेची वस्तू बनली असल्याच्या प्रतिक्रियाही याच बसस्थानकातील अनेक चालक-वाहकांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीकडे खासगीत व्यक्त केल्या. ठक्कर बझार, मेळा, सीबीएस, महामार्ग बसस्थानकांतदेखील असे प्रकार अाता वाढू लागले असून, यामुळे चालक-वाहकांसह प्रवाशांची सुरक्षादेखील धाेक्यात अाली अाहे. उत्पन्नातही माेठा ताेटा सहन करावा लागत अाहे.

वाहनांचे क्रमांक देऊनही कारवाई हाेत नसल्याच्या तक्रारी...
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत काही रिक्षा तथा टॅक्सीचालकांकडून थेट बसस्थानकामधून प्रवासी पळवले जातात. नाशिकराेड बसस्थानकात हे प्रकार सर्वाधिक अाहेत. अशा रिक्षा वा टॅक्सीचालकांच्या वाहनांचे क्रमांक वाहतूक शाखेला देऊनही त्यांच्याकडून संबंधितांवर कारवाई हाेता उलट सोयीस्करपणे दुर्लक्षच केले जात आहे. परिणामी, कारवाई टाळण्यामागे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचीही चर्चा आहे.

बसस्थानकांत सुरक्षारक्षक नेमावेत
चालक-वाहकांना होणारी मारहाण, शिवीगाळ, बसस्थानकातून प्रवासी पळविले जाणे आदी प्रकार रोखण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य बसस्थानकांत सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी अाता जाेर धरू लागली अाहे. प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनीदेखील याबाबत ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीकडे बाेलून दाखवले.

रिक्षाचालकांकडून हाेते शिवीगाळ
^बसच्याशेजारीचरिक्षा उभी करून प्रवासी पळविले जातात. याबाबत विचारणा केल्यास संबंधित रिक्षा वा टॅक्सीचालकांकडून शिवीगाळ, मारहाण केली जाते. पाेलिसदेखील त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. -लक्ष्मण जायभावे, बसचालक

एसटीला कारवाईचे अधिकार द्या
^बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचे प्रकार गंभीर असून, अशाप्रकारे नियमबाह्यरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसस्थानकांत घुसखाेरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार एसटी प्रशासनाला द्यावे. -के. व्ही. पगारे, वाहतूक नियंत्रक

कडक कारवाई हाेणे अपेक्षित
^थेट बसस्थानकात रिक्षा आणून प्रवासी पळविले जातात. या प्रकारांमुळे एसटीच्या उत्पन्नावर माेठा विपरीत परिणाम होत असल्याने अशा नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई अपेक्षित अाहे. -नितीन जगताप, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार सेना
दंडात्मक कारवाईचे अधिकार देणे गरजेचे
नियमांना पायदळी तुडवत प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धाेका निर्माण करणाऱ्या अाणि थेट बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांविराेधात कडक कारवाई हाेणे गरजेचे अाहे. पाेलिसांना शक्य नसल्यास किमान एसटी प्रशासनाला तरी अशा वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास असे शक्यही हाेईल.

बसस्थानकांभाेवती कंपाउंड उभारणार
^शहरातील मुख्य बसस्थानकांभाेवती वाॅल कंपाउंड उभारण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. जेणेकरून थेट बसस्थानकांत हाेणारी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची घुसखाेरी राेखण्यात यश येईल अाणि उत्पन्नवाढीसाठीही हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. -यामिनी जाेशी, विभागीय नियंत्रक
..तर परवाना रद्दची कारवाई केली जाणार
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून थेट बसस्थानकांत घुसखाेरी करीत प्रवासी पळविले जात असल्याचे चित्र शहरातील जवळपास सर्वच बसस्थानकांत दिसून येते. मात्र, नाशिकराेड बसस्थानकात ही समस्या प्रामुख्याने भेडसावत असून, तब्बल ५० टक्के उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी साेडावे लागत असल्याचे समाेर अाले अाहे. रेल्वेस्थानकातून येणारे प्रवासी शहरातील विविध भागांत जाण्यासाठी बसस्थानक गाठतात, मात्र या ठिकाणी खासगी प्रवासी वाहतूक करणारे या प्रवाशांना कमी भाडे लवकर पाेहाेचवण्याचे अामिष दाखवून पळवून नेतात, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबराेबरच एसटीच्या उत्पन्नाचाही प्रश्न गंभीर बनला अाहे. विशेष म्हणजे, विराेध केल्यास अनेकदा टॅक्सी वा रिक्षाचालकांकडून बसचालक-वाहकांना मारहाण, शिवीगाळ करण्याचेही धारिष्ट्य दाखवले जात असल्याच्या तक्रारी या बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनीच केल्या अाहेत. याबाबत वाहतूक पाेलिसांकडून मात्र साेयीस्करपणे दुर्लक्षच केले जात असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. त्यावर हा प्रकाशझाेत...
नाशिकराेड, मेळा, ठक्कर बझार बसस्थानकांत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची वाढली वर्दळ; कमी भाडेशुल्काचे दाखवतात अामिष
जयंत बजबळे, सहायकअायुक्त, वाहतूक शाखा
{थेट बसस्थानकातून नियम धाब्यावर बसवत प्रवासी पळवण्यासाठी रिक्षा, टॅक्सीचालक घुसखाेरी करतात. त्यांच्यावर कारवाई का हाेत नाही?
-नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा वा टॅक्सीचालकांविरोधात कारवाई करून त्यांच्यावर अाता परवाना रद्दची कारवाई करण्यात येईल.
{एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या रिक्षा क्रमांकावर अद्याप कारवाई का करण्यात अाली नाही?
-याबाबत सविस्तर माहिती घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग, एसटी महामंडळ वाहतूक पोलिसांद्वारे लवकरच संयुक्त कारवाई करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...