आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइन फेस्टिव्हल देशाची ओळख बनावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-परदेशामध्ये वाइन फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगभरातील लाखो नागरिक फेस्टिव्हलला भेट देत असतात. नाशिक जिल्ह्यातही वाइन फेस्टिव्हल सुरू होतोय, ही आनंदाची बाब आहे. हा वाइन फेस्टिव्हल देशाची ओळख बनावा. त्यासाठी कृषी मंत्रालयाकडून हवी ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले.
भारतीय द्राक्ष प्रक्रिया महामंडळ आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 16 फेब्रुवारी रोजी विंचूर वाइन पार्क येथे होणाºया इंडिया ग्रेप्स हार्वेस्टच्या (वाइन फेस्टिव्हल) अनौपचारिक उद्घाटन समारंभात पवार बोलत होते. कृषिमंत्री पवार आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे हवेत फुगे सोडून करण्यात आली. या वेळी पवार म्हणाले की, जगामध्ये दक्षिण अफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स हे देश वाइन उद्योगात प्रगती करीत आहे. हा उद्योग भारतातही सुरू केल्यास शेतकरी आणि नागरिकांना त्यापासून रोजगार उपलब्ध होईल हा उद्देश आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रातही हार्ड लिकरपेक्षा वाइन ही विशिष्ट प्रमाणात सेवन केली तर त्याचा आरोग्याला लाभ होतो, असे म्हटले आहे. वाइन उद्योगाबाबत याआधी काही चुका झाल्या होत्या. त्याबाबत खबरदारी घेण्यात आली असून वाइनची द्राक्षांची लागवड वाढण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. खासदार समीर भुजबळ, महामंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर, खासदार प्रताप सोनवणे, वनाधिपती विनायक पाटील, वाइन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव आहेर, मनोज जगताप हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन संघाचे सचिव राजेश जाधव यांनी केले.
फलक वाइन मार्टचे, पण विक्री दारूची : छगन भुजबळ
शहरातील दुकानाबाहेर फलक वाइन मार्टचे लावलेले असतात, मात्र त्यामध्ये वाइनची एकही बाटली नसते. त्याच्या नावे भलतेच काहीतरी विकले जाते. पण वाइन म्हणजे दारू नाही, असे स्पष्ट करताना पर्यटनमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, वाइन उद्योग हा अजूनही अडचणीत असून त्यातून बाहेर येण्यासाठी थोडा कालावधी लागेल. मात्र वाइन उद्योगामुळे येथील कृषी पर्यटन वाढणार असल्याने त्यांना पर्यटन विभागातर्फे परिपूर्ण मदत करण्यात येईल.
वाईन फेस्टिव्हलच्या अनौपचारिक उद्घाटन समारंभात बोलताना कृषिमंत्री शरद पवार.
द्राक्ष लागवड वाढली; निर्यातीतही वाढ होणार
नाशिक । बेभरवशाचे परंतु नगदी पीक असल्याने द्राक्षांसाठी अनेक शेतकरी पसंती देत आहेत.
नाशिक जिल्ह्यात या वर्षी 4 हजार 114 बागांची जास्त नोंदणी झाल्याने द्राक्ष निर्यातीत वाढ
होण्याची शक्यता आहे. 2012-13 मध्ये एकूण 15 हजार 679 बागांची नोंदणी झाली होती, तर या वर्षी म्हणजे 2013-14 मध्ये 19 हजार 703 बागांची 13 हजार 900 हेक्टरवर नोंदणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षाला पसंती देत आहेत. यात नव्या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये नानासाहेब परपल, जंबो, शरद सीडलेस आदी रंगीत व्हरायटीच्या जातीला प्राधान्य देत आहे. तसेच सफेद व्हरायटीच्या जातीही वाढल्या आहेत. परदेशातून नाशिकच्या द्राक्षांसाठी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. युरोपियन बाजारातील सुपर मार्केटची मागणी वाढल्याने निर्यात अधिक वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी दिली.