नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांतही कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापीठात ७ लाख ५० हजार विद्यार्थी असताना दरवर्षी तब्बल २२ लाख ५० हजार विद्यार्थ्यांच्या हिशेबाने पुस्तकांची बिले अदा करण्यात आल्याची धक्कादायक बाब खुद्द कुलगुरू ई. वायुनंदन यांनीच उघडकीस आणली आहे. कुलगुरूंनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसही सुरुवात केली होती. परंतु, ज्या दिवशी ते पुस्तक भांडाराची पाहणी करणार त्याच्या आदल्या दिवशीच या विभागाला आग लागून सर्व रेकॉर्ड जळून खाक झाल्याने यामागे संशयाचा धूर निघत आहे.
विद्यापीठात प्रवेशानंतर देण्यात येणारी पुस्तकेच अनेकदा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. मात्र, दुसरीकडे पुस्तकांच्या नावाखाली कोट्यवधींची बिले विद्यापीठाकडून वसूल केली जात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत खरेदी केलेली व छापण्यात आलेली पुस्तके, त्यावरील खर्च तसेच भांडाराची माहिती कुलगुरूंनी मागवली होती. परंतु, त्याआधीच सर्व रेकॉर्ड जळाले असून याबाबत विद्यापीठाकडून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या आगीचे कारण विद्यापीठासह पोलिसांनाही समजले नाही. त्यामुळे ही आग कुणी लावली याचा शोध पोलिस घेत आहेत.
यंदा पुस्तक छपाईला ब्रेक
गेल्या काही वर्षांपासून तीन वर्षांचा एकाच वेळी पुस्तकांच्या छपाईखाली कोटींचा खर्च विद्यापीठाकडून केला जात होता. प्रत्यक्षात मात्र पुस्तके केवळ एकाच वर्षाची घेतली जात होती. त्यामुळे यंदा शिल्लक पुस्तकेच विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार असून नवीन पुस्तक छपाईला यंदा ‘ब्रेक’ लावल्याची माहिती कुलगुरू ई. वायुनंदन यांनी दिली.
आगीच्या कारणाचा शोध सुरू
- पुस्तक भांडाराची चौकशी सुरू केल्यानंतर अचानक भांडाराला आग लागली. भांडारात कुठलेही शॉर्टसर्किट झाले नाही. आग लागणार अशीही काही वस्तू भांडारात नव्हती, मग आगीचे कारण काय, याचा शोध घेतला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
ई. वायुनंदन, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ