आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस लाखांना गंडा घालणार्‍या नायजेरियन नागरिकास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कोका-कोला कंपनीच्या नावे आलेल्या एसएमएसद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून नाशिकमधील एका रहिवाशाला सुमारे तीस लाख रुपयांना गंडा घालणार्‍या एका नायजेरियन नागरिकास पोलिसांनी बिटको चौकात सापळा रचून अटक केली. तब्बल चार वर्षांनंतर गुन्हा उघडकीस आला आहे.

नाशिकरोड येथील एका नागरिकास कोका-कोला कंपनीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एसएमएस आला होता. पाच लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे संदेशात म्हटले होते. या नागरिकाने एसएमएसमध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून बक्षिसासंबंधी माहिती घेतली. फोनवर बोलणार्‍या व्यक्तीने बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचे सांगितले. त्यानंतर विविध बँकांच्या खात्यात या नागरिकाने 30 लाख रुपये जमा केले. मात्र, बक्षिसाची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने उपनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेत वर्ग केला गेला. आठ दिवसांपूर्वी अनोळखी मोबाइल क्रमांकावर फिर्यादीस कॉल आला. या क्रमांकाचे लोकेशन शहरात आढळून आल्याने पैसे देण्याचे आमिष देऊन अटक करण्यात आली.

इतर राज्यांतून माहिती मागवली
चौकशीत विविध राज्यांत फसवणूक केल्याचे या संशयिताने सांगितले. इतर राज्यांतील तक्रारदारांची माहिती घेणे सुरू आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. -संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा

आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येणार
नायजेरियन टोळीकडून अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविले जाते. देशभरात अशाप्रकारचे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. देशातील काही संशयित यात सामील असून, त्यांचा वापर गंडा घालण्यासाठी करण्यात येतो. नाशिकमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय संशयितास पकडण्यात आले आहे.

काळजी घेतल्यास टळतील गुन्हे
परदेशातील क्रमांकावरून मोबाइलवर येणार्‍या कॉलला प्रतिसाद देऊ नये तसेच अशा प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करावे. फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. -अजय चांदखेडे, निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा