आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव ‘अंजना’, ‘रेणुका’; कृत्य मात्र पुतनेचे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापुरात सुरुवात झालेल्या या हत्याकांडाचा शेवट नाशिकमध्ये झाला. 22 ऑक्टोबर 1996 रोजी पंचवटी ठाण्यात प्रतिभा गावित ही महिला धापा टाकत आली. ‘साहेब’ त्या दोन्ही सवतीच्या मुलींनी माझा पोटचा गोळा हिसकावून नेला. हे ऐकून काळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ गावित यांना जीपमध्ये बसविले. त्या दोघींना मार्केट यार्डातून रिक्षेत बसताना बघितले. काळे यांनी दोघा कर्मचार्‍यांना दिंडोरी नाक्याच्या दिशेने पाठविले. अवघ्या चारशे मीटर अंतरावरच रिक्षा पकडली. त्या दोघी पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिथेच प्रतिभाने पायातील चपलेने सीमा व रेणुकाला मारण्यास सुरुवात केली. माझे लेकरू क्रांती कुठे? ती कशी आहे? आक्रोशाने विचारत होती. दोघींची पोलिसांनी कसून चौकशी करताच त्या म्हणाल्या, ‘माझ्या आईने क्रांतीला पुण्यात रेल्वेतून फेकून दिले, तिचाही मृत्यू झाला.’ परंतु अशी घटना घडलीच नसल्याचे पुणे पोलिसांकडे चौकशी केल्यावर लक्षात आले. चार दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपत होती. पोलिसी खाक्या दाखवित स्वतंत्रपणे जबाब नोंदविला. यात, सीमा गावित हिने क्रांतीला रेल्वेखाली चिरडून टाकत कोल्हापूरला रवाना झाली, तर रेणुका शिंदे हिने रेल्वेतून फेकून पुण्यात स्थायिक झाल्याचे सांगितले. दोघींना समोरासमोर आणल्यावर क्रांतीची हत्या झाली असून, अंजनाबाई पुण्यात गोंधळवाडीत राहते, असे समजले. दोन्ही बहिणी नाशकात राहात असलेल्या एन. डी. पटेलरोडवरील खोलीची झडती घेतली. मुलांचे कपडे, पर्स, पाकिटे, सोन्याच्या पोती, छोटे कटर, हत्यारे आढळले. यात्रा, बसस्थानकात गर्दीत दागिने, पाकिटे चोरायचा हा धंदाच सुरू केल्याची कबुली दोघींनी दिली.

काळे यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ दोघींना सोबत घेत पुण्याकडे रवाना झाले. गोंधळेवाडीत कुलूप आढळले. कुलूप तोडून झडती घेतली. तिथेही चोरीची पाकिटे, मुलांचे फोटो सापडले. त्यातीलच एक नाशिकची अंजली दिवाण. दोन वर्र्षांपूर्वी कालिका यात्रोत्सवातून उचलून आणली. तिचा गळा घोटून मारल्याची त्यांनी कबुली दिली. हे ऐकून सगळे थक्कच झाले.

निर्दयीपणाचा गाठला कळस..
अंजनाबाईचा नवरा मोहन गावित हा हमाली करायचा. तिथेच एका महिलेसोबत त्याचे संबंध होते. मग अंजनाबाईने दोन्ही मुलींसह यात्रोत्सवात पाकीटमारी सुरू केली. त्यातच लहान मुलांना पळवून भीक मागून पैसे कमवायचे. कोल्हापूरच्या मंदिरात आईपासून हरवलेल्या चार वर्षाच्या संतोषला सर्वप्रथम 1990मध्ये पळविले. जखमी संतोषचे रडणे काही बंद होईना. बसस्थानकावरील लोखंडी बारवरच त्याचे डोके आदळून त्याला ठार मारले. त्याचा मृतदेह फडक्यात गुंडाळून बाजूच्या पटांगणात टाकला. नंतर नाशिकच्या कालिका यात्रोत्सवात गोबर्‍या मुलीला पळविले. तिचे नाव पिंकी ठेवले. जेजुरीच्या यात्रेत नेले. तोपर्यंत तीन-चार मुले जमा झाली होती. पैसे चोरून पुण्यातील हडपसरला परतले. सायंकाळी गच्च्ीवर स्वयंपाक करीत असताना पिंकी रडू लागली. तिचे रडणे थांबेनाच. मग अंजनाबाईने तिला जिन्यावरून ढकलूनच दिले. रेणुकाने उचलून आणले. एकीने हात-पाय घट्ट धरले. सीमाने नाक-तोंड दाबून तिला मारून टाकले. तिचा मृतदेह एका पिशवीत घालून दिला. रात्री उशिरा किरण शिंदे याने सासवडच्या झाडीत टाकून दिले. तीच अंजली दिवाण होती. नाशिकच्याच भावना विसपुते रा. नेहरू चौक या बालिकेला जानेवारी 1996 मध्ये उचलून नेत कोल्हापूरमध्ये नेले. तिथे काही दिवस चोर्‍या करून झाल्यावर क्रूरपणे दगडावर आपटून मारून टाकले.

फाशीचा माग..
निरीक्षक मंडलेश्वर काळे, उपनिरीक्षक दिलीप बस्ते, हवालदार बी. डी. परदेशी, शेखर फडताळे, सुमन जोशी यांच्या पथकाने त्रिकुटाचा पर्दाफाश केला. तीन महिन्यांच्या चौकशीत 9 मुलांचे अपहरण, हत्या उघडकीस आल्या. नाशिकच्या तिघांसह राज्यभरात गुन्हे दाखल झाल्याने सीआयडीकडे तपास सोपविण्यात आला. या पथकातही काळे यांची महत्त्वाची भूमिका होती. 2001 मध्ये कोल्हापूर न्यायालयाने या तिघींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, काळे व पथकास शासनाकडून रोख बक्षीस आणि उत्कृष्ट अन्वेषण अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

कोथरूडला सापडली अंजनाबाई
काळे यांनी कोथरूड परिसरात साध्या वेशात फिरून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंजनाबाईचा फ्लॅट शोधला. तेथेही फोटो, मुलांचे कपडे, खेळण्या, दागिने सापडले. त्याच कालावधीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने किरण शिंदे यास पकडण्यात आले. नाशिकला आणल्यावर दोन दिवसांच्या चौकशीनंतरही अंजनाबाई तोंड उघडेना. त्यानंतर आता सांगितले तर तुला कमीत कमी शिक्षा होईल, असे सांगताच तिने दुष्कृत्याचा पाढा वाचला..
पोटाची खळगी भरण्यासाठी ऐशोरामात जीवन जगण्यासाठी दुसर्‍याच्या काळजाचा तुकडा हिरावून त्यास अमानुषपणे वागवायचे. चिमुरड्यांना भीक मागण्यापासून तर चोर्‍या करायला लावायच्या. पकडले गेले तर जागेवरच एखादी वस्तू खाली आदळावी तसे चिमुरड्यांना त्या माणसाच्या पायावर आदळायचे. जखमी झालेले मूल भीक मागण्यास तयार नसले, त्यांचे रडणे न थांबल्यास त्यांना दगडावर तर कधी लोखंडी बारवर, तिसर्‍या मजल्यावरून खाली फेकून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची. एक दोन नव्हे तर 13 चिमुरड्यांचे अपहरण, त्यातील नऊ बालकांचे हत्याकांड घडविणार्‍या आई व दोन्ही मुलींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. हीच शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी या आरोपींचा दयेचा अर्जही फेटाळला. यातील अंजनाबाई गावित व तिच्या रेणुका, सीमा या दोन्ही मुलींना नाशिकमध्ये पकडणारे मंडलेश्वर काळे त्यांच्याच शब्दात ही हृदयद्रावक कथा..