आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Amrutkar Article About Nashik's First Encounter, Divya Marathi

सतर्कतेमुळे विकृतीला फास , नाशकातील पहिला एन्काउंटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेसाठी शहरात बंदोबस्त तैनात होता. झेडप्लस सुरक्षेव्यस्थेमुळे बहुतांश अधिकारी फौजफाट्यासह नियुक्त होते. सभा सुरू होण्याच्या वेळेतच तत्कालीन उपआयुक्त मकरंद रानडे यांना चुंचाळे परिसरातून फोन आला. तिथे मुलीच्या तोंडात मातीचा ढेकूळ कोंबून मारलेल्या अवस्थेत फेकून दिल्याचे पलीकडील व्यक्तीने सांगितले. रानडे यांनी अंबडचे निरीक्षक रमेश पाटील व सातपूरचे नितीन मिटकर यांना घटनास्थळी पोहोचण्याची सूचना केली. आदल्या दिवशी सिडकोतून बेपत्ता झालेल्या मुलीचे छायाचित्र सर्वच पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले होते. रानडे यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावून घेण्याचे सांगितले.

पोलिसांपाठोपाठ त्या मुलीचे कुटुंबीय पोहोचले. मुलीचे कपडे आणि तिची अवस्था बघून आक्रोश केला. आईला तर धक्काच बसल्याने ती कोसळली. कसाबसा धीर देत पोलिसांनी त्यांना घरी पोहोचविले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर प्राप्त अहवालात तिच्यावर बलात्कार करून मग तिचा गळा दाबून आणि तोंडात माती कोंबून खून केल्याचे उघडकीस आले. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध होताच राजकीय पक्ष, संघटनांकडून अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला होता. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. वातावरण तापले असल्याने सिडको परिसरातील अनेक चौकांमध्ये निरीक्षक पाटील यांनी बैठका घेत नागरिकांना विश्वासात घेतले. अंबड, सातपूर भागातील 150 हून अधिक सराईत आणि बाहेरच्या जिल्ह्यातील रेकार्डवरच्या गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, काहीही धागेदोरे हाती लागत नव्हते.

घटनेला ज्या दिवशी महिना पूर्ण झाला, त्याच दिवशी वर्तमानपत्रांमध्ये यंत्रणा ठरतेय अपयशी, रिंकूचे मारेकरी अद्याप मोकाट अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच दिवशी मध्यरात्री निरीक्षक पाटील, कर्मचारी सिडको परिसरात रात्री गस्तीवर असताना उत्तमनगर भागात एका लहान मुलीला घेऊन जाताना त्यांना एक सायकलस्वार दिसला. त्याने ती आपली भाची आहे, तिला तिच्या आईकडे सातपूरला सोडण्यास जात असल्याचे सांगितले. इतक्या लांब सायकलवर नेण्यापेक्षा तुला आम्ही गाडीतून सोडून देण्याचे पाटील म्हणाले.

सुरुवातीला नकार देणारा तो नंतर पोलिसांच्या गाडीत बसला. मात्र, थोडे अंतर जाताच बहिणीकडे नको, मला घरीच सोडा अशी त्याने विनंती केली. पाटील यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याचे नाव, पत्ता विचारल्यावर विजय बाबासाहेब नन्नावरे (वय 24) सहाव्या स्कीममध्ये राहतो, असे त्याने सांगितले. त्याच्या घराजवळ येताच आई-वडील वृद्ध असल्याने ते तुम्हाला बघून घाबरतील, असे म्हणत तो उतरला. पाटील यांनी न थांबता गाडी पुढे घेतली. लागलीच कर्मचार्‍यास त्यावर नजर ठेवण्यास सांगितले. तो घराकडे न जाता गाडी गेल्याचे बघून पळत सुटला. तोच कर्मचार्‍याने त्यास पकडले. पाटीलही आले. घरी चल अन्यथा इथेच बडवतो, असा दम पाटील यांनी भरताच पहिल्या मजल्यावर नेले. बेल वाजविताच त्याची आई बाहेर आली. हा तुमचा मुलगा आणि नात आहे का? अशी विचारणा करताच, आई तावातावात बोलायला लागली. हा मेल्याला बायको वागविता आली नाही, दररोज दारू ढोसून घरी येतो, या मुलीचा काहीही संबंध नाही. तोच बहीणही बाहेर आली. मला दोन महिन्यांचे मूल आहे. ज्याचे पोर असेल त्याला देऊन टाका साहेब, असे त्याच्या बहिणीने व आईने सांगितले.

मग त्यानेही उत्तमनगर भागात ही मुलगी सापडल्याचे सांगितले. त्या भागात गाडी नेताच रस्त्यात उभ्या असलेल्या नागरिकांनी गाडीला हात दिला. गाडी थांबताच ते म्हणाले आजीच्या कुशीत झोपलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिला आम्ही दोन तासांपासून शोधतो आहे. तेवढय़ात तिच्या आजीला बोलावले. गाडीतील मुलगी दाखविताच हीच माझी नात म्हणत तिला कवटाळले. युवकाबद्दल काही न सांगता कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत त्यांची तक्रार घेतली. नन्नावरे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची कसून चौकशी केली. मात्र, तो काहीच बोलेना. तेवढय़ात रिंकूच्या तपासाबाबत महिला संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यात आल्याचे समजले. निवेदनाबरोबरच अपहृत मुलीची सुटका केल्याबद्दल अभिनंदनही केले. त्या चर्चेतच रिंकूचे आणि संशयिताचे घर जवळच असल्याचे व तोदेखील सायकलस्वारच होता, असे लक्षात आले. नन्नावरे मात्र काहीच बोलत नव्हता. मग रिंकूच्या धाकट्या बहिणीला बोलावले. तिने क्षणाचाही विचार न करता हेच काका दीदीला घेऊन गेल्याचे सांगितले. तिथेच त्याचा पर्दाफाश झाला. त्यास बेदम चोप देताच त्यानेही कबुली देत घटनाच कथन केली. तुझ्या वडिलांनी बेालावल्याचे सांगत तिला सायकलवरून नेले. चुंचाळे भागात नेऊन कपडे उतरविताच ती ओरडली. लोक गोळा होतील, या भीतीने तिचा गळा दाबला आणि त्याच वेळी तोंडात मातीचा ढेकूळ कोंबल्याची त्याने कबुली दिली.

त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, खुनाचा गुन्हा दाखल झाला. सबळ पुराव्यानिशी महिनाभरात दोन्ही घटनांचे वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोन वर्षांच्या आत खटल्याची सुनावणी झाली. प्रत्यक्ष साक्षीला हजर राहत तपासी अहवाल योग्य पद्धतीने सादर केल्याने नन्नावरे यास रिंकूच्या गुन्ह्यात जन्मठेप, तर दुसर्‍या गुन्ह्यात 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, रिंकूचा गुन्हा उघडकीस आल्यावर ज्या संघटनांनी मोर्चे काढले होते, त्यांनीच पाटील व पथकाचा जाहीर सत्कारही केला.

नाशकातील पहिला एन्काउंटर
शहरात 13 ऑगस्ट 2005 मध्ये महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावत भररस्त्यात त्यांचा विनयभंग करणे, उचलून नेणे अशा प्रकारच्या घटनांचे सत्र सुरू होते. महिलावर्गात प्रचंड दहशत निर्माण होऊन पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जात होता. संशयित बंटी शर्मा याच्या मुसक्या आवळायच्याच, असा पक्का निर्धार यंत्रणेने केला होता. या शर्माविरुद्ध नाशकातच नव्हे, तर बाहेरच्या जिल्ह्यांत बलात्कार, खून, अपहरण, लुटमारीसारखे 145 गुन्हे दाखल होते. त्याला पकडण्यास गेलेल्या पथकावर त्याने गोळीबार करताच त्याला प्रत्युत्तर देत त्याचा इंदिरानगर भागात जागीच खातमा केला होता. शहरातील हा पहिला एन्काउंटर वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील यांच्या नावे नोंदला गेला. त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे.

सिडको, उत्तमनगर परिसरात रामलीलेचा कार्यक्रम सुरू होणार होता. नऊ वर्षांची रिंकू हातपाय धुऊन, छानसा फ्रॉक घालून कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत, तिची लहान बहीण मागे लागल्याने आई तिला म्हणाली, धाकटीलाही घेऊन जा.. रिंकूने मग तिचेही आवरले.. दोघी आनंदात, हसत-खेळत रामलीला बघण्यासाठी पोहोचल्या.. धाकटी घरी परतली.. पण, रिंकू मात्र परतलीच नाही.. रिंकू कुठे गेली, तिला कोणी नेले.. याचा परिसरातील नागरिक, कुटुंब, पोलिस कसून तपास करत असतात. पुढे काही दिवसांनी एक कुटुंब मध्यरात्री त्यांच्या घरातील मुलीला शोधताना पोलिसांना दिसतात. योगायोगाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विकृत इसमाकडील मुलगी ही त्यांचीच असते आणि पुढे मग रिंकूचाही तपास याच घटनेतून लागतो.. पोलिसांची सतर्कता, नागरिकांचा विश्वास आणि मदत या केसमध्ये अतिशय महत्त्वाची ठरल्याचे ही केस महिनाभरात उलगडणारे अंबड पोलिस ठाण्याचे तत्कालीन व सध्या भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील सांगतात, तेव्हा ती घटना डोळ्यापुढे उभी राहते..