आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Amrutkar Article About The Bloody Women, Divya Marathi

अखेर मुलीची मारेकरी माता झाली गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रोध हा माणसाला किती विनाशाकडे नेऊ शकतो, याची कल्पनाही करवणार नाही इतका क्रूर प्रसंग अकोल्यातील पिंजर गावानजीकच्या वस्तीवर घडला. हजार लोकसंख्येच्या एका छोट्याशा गावातून तीन वर्षांची बालिका अचानक बेपत्ता होते. आठवडा उलटूनही तिचा तपास लागत नाही. सर्वच कुटुंबीय दहशतीच्या छायेत वावरत होते. पोलिस पाटलांसह ग्रामस्थांचा यंत्रणेवर दबाव वाढत होता. अशा परिस्थितीत तत्कालीन सहायक निरीक्षक व सध्याचे नाशिक पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक मनोहर दाभाडे यांनी वस्तीवरच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला अन् बेपत्ता मुलीचा मृतदेह शोधून काढत हे सर्व कटकारस्थान उघडकीस आणण्यात ते यशस्वी ठरले.
अकोला जिल्ह्यातील पिंजर (बार्शीटाकळी) या गावात 1996 मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. श्यामराव कांबळे या शेतमजुराच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर दहा वर्षांची रत्ना आणि चार वर्षांची आम्रपाली या दोन्ही मुलींचा सांभाळ करणे श्यामराव यांना अवघड झाले. यासाठी त्यांनी नात्यातीलच घटस्फोटीत असलेल्या सिंधूबाईशी पुनर्विवाह केला. सिंधूबाईने आपला 14 वर्षांचा मुलगाही सोबत ठेवण्याचा आग्रह धरला. मात्र, शेतमजुरीमुळे फारसे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने त्याने यास नकार दिला. यावरून पती-पत्नीत काही दिवस वाद सुरू होता. याचाच राग ती दोन्ही सावत्र मुलींवर काढायची आणि त्यांचा छळ करायची.
एके दिवशी दुपारी बाहेर खेळताना आम्रपाली अचानक गायब झाली. रत्नाने घरात विचारणा केली. पण, ती घरात नसल्याचे समजले. मग तिच्या मैत्रिणींकडेही शोध घेतला. सायंकाळी तिचे वडील श्यामराव घरी आल्यावर तिघांनी पूर्ण वस्ती पालथी घातली तरी ती सापडत नसल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला. संपूर्ण रात्र त्यांनी जागूनच काढली. दिवस उजाडताच श्यामराव व सिंधूबाई दोघेही चार किलोमीटरवरील पिंजर पोलिस ठाण्यात गेले. ठाण्याचे प्रमुख मनोहर दाभाडे यांनी तक्रारदारांची चौकशी केली. मुलीचे वय, वर्णन विचारून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लागलीच तक्रारदारांबरोबरच त्यांनी वस्ती गाठली. पोलिस पाटील, ग्रामस्थांसह मळ्या-खळ्यांत चौकशी सुरू झाली. नजीकच्या विहिरी, तळे बघितले. संपूर्ण जिल्ह्यात आम्रपालीची माहिती छायाचित्रासह पोहोचविण्यात आली. मुलीचा तपास लागत नसल्याने वडील आणि बहिणीची प्रकृती खालावत होती. विहिरीवर पाणी भरण्यासाठी येणार्‍या इतर महिला सिंधूबाईलाही आस्थेने विचारायच्या. तीही रडून रडूनच सांगायची, ‘तिच्या बाची खूप लाडकी होती, काय झाले असेल?’
याच दरम्यान सिंधूबाईही घरातून बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यानंतर दाभाडे यांनी वस्तीवर जाऊन सूत्रे फिरवित आम्रपालीसोबत खेळणार्‍या मुलींच्या घरी जाऊन विचारणा केली. त्यांना उत्तर मिळाले की, ‘रत्नाला दुकानात चार ते पाच वस्तू घेण्यासाठी पाठवून तिच्या आईने आम्रपालीला ओढत घरात नेले. त्यांनतर ती परत दिसलीच नाही.’ ही चिमुकली न थांबता बोलतच राहिली, ‘तिची आई तिला खूप मारायची, अंगाला चटके द्यायची, जेवायलाही द्यायची नाही.’ हाच धागा पकडून संशयाची सुई सिंधूबाईकडे वळवली. तिथून श्यामरावच्या घरी जबाब नोंदविण्यास गेले. घरात घुसताच कुबट दुर्गंधी सुटली. नाकाला रूमाल लावून घराची झडती घेतल्यावर सरपण(लाकडे) रचलेल्या जागेतूनच दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. दाभाडे यांच्या सूचनेनुसार लाकडे बाजूला करून तिथे खेादण्यास सांगितले. मोठे खड्डे आणि त्यात एकीकडे शिर, तर दुसरीकडे शरीर पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळले. कपडे, चेहर्‍यावरून ‘ही तर माझी आम्रपाली आहे,’ असे म्हणत श्यामराव ओक्साबोक्सी रडू लागला आणि म्हणाला, ‘साहेब, त्या करंट्या सिंधूनेच मारले असेल तिला, ती खूप छळायची पोरींना.’
श्यामरावच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधूबाईच्या माहेरी, नातलगांकडे चौकशी केल्यावर ती घरी आलीच नसल्याचे सांगण्यात आले. तरीही पोलिसांनी गावात पाळत ठेवत आजूबाजूच्या गावांतही तिचा शोध घेतला. मात्र, काहीही हाती लागले नाही. घटनेला महिना होण्याच्या आदल्या दिवशी रात्री तिच्या माहेरी कानडी या गावी साध्या वेशातील महिला कर्मचार्‍याने सिंधू गावात आल्याचे कळविले. कुठलीही खात्री न करता शासकीय वाहन नसताना दाभाडे हे दुचाकीवरच निघाले. मध्यरात्रीच तिच्या घरातून महिला कर्मचार्‍याच्या मदतीने तिला ताब्यात घेतले अन् घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पिंजर पोलिस ठाण्यात आणले. जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात सिंधूने पोलिसांवरच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. दाभाडे यांनी कसून चौकशी केल्यावरही ती कबूल होईना.
अखेरीस ‘तुझ्या संतोषलाच जेलमध्ये टाकतो, त्यानेच आम्रपालीची हत्या केली आहे. त्यास प्रत्यक्षदर्शींनी बघितलेही आहे. आता तो आयुष्यभर जेलमध्येच सडेल,’ असे सांगताच सिंधू फडाफडा बोलू लागली. तिच्या चेहर्‍यावर कुठलीही अपराधीपणाची भावना दिसत नव्हती. ‘मुलाने नाही, त्याच्या हक्कासाठी मीच विळ्याने तिचा गळा चिरला. शिर व धड वेगळे केले. माझा पती त्याच्या मुलींना दररोज खाऊ आणायचा. माझ्या पोराचा विचारही करायचा नाही, तिचे खूप लाड करायचा, तिला बघून मला संताप व्हायचा. त्या दिवशी मीच रत्नाला वस्तू आणायला पाठवून मी बाहेर जाणार असल्याने उशीरा ये, असे सांगितले. नवराही रात्रीच घरी येतो, हे लक्षात घेऊन दुपारीच पोरींबरोबर खेळत असताना तिला गूळ देण्याचा बहाणा करीत ओढून आणले. गूळ घेण्यासाठी खाली वाकताच विळ्याने तिचा गळा कापला. कोणाला संशय येऊ नये, म्हणून बाजूलाच खड्डा खोदून त्यावर शेण, माती टाकून बुजवला. त्यावर बाहेरचे सरपणही आणून टाकले. मात्र, आठ-दहा दिवसांत दुर्गंधी सुटल्याने मी भीतीने घरातून पळ काढला,’ असा सर्व घटनाक्रम सिंधूबाईने एका दमात सांगितला.
हजार लोकसंख्येच्या गावातून तीन वर्षांची बालिका अचानक बेपत्ता होते. आठवडा उलटूनही तिचा तपास लागत नाही. मात्र, तत्कालीन सहायक निरीक्षक व सध्याचे नाशिक पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक मनोहर दाभाडे हे त्या मुलीचा मृतदेह शोधत कटकारस्थान उघडकीस आणण्यात यशस्वी होतात.
‘होय, मीच ठार केले तिला..
. मीच विळ्याने तिचा गळा चिरला. शिर व धड वेगळे केले. माझा पती त्याच्या मुलींना रोज खाऊ आणायचा. माझ्या पोराचा विचारही करायचा नाही, तिचे खूप लाड करायचा, तिला बघून मला संताप व्हायचा. त्या दिवशी मीच रत्नाला वस्तू आणायला पाठवले. नवरा रात्रीच घरी येतो, हे लक्षात घेऊन दुपारीच पेारींमध्ये खेळताना तिला घरात घेतले आणि विळ्याने तिचा गळा कापला. कोणाला संशय येऊ नये, म्हणून बाजूलाच खड्डा खोदून त्यावर शेण, माती टाकून बुजवला. त्यावर बाहेरचे सरपणही आणून टाकले. मात्र, आठ-दहा दिवसांत दुर्गंधी सुटल्याने मी भीतीने घरातून पळ काढला,’ अशा शब्दांत निर्दयी मातेने अखेर आपला गुन्हा कबूल केला. हा घटनाक्रम ऐकताना उपस्थितांच्या अंगावर काटे आले.
विविध पदकांसह झाला गौरव
तत्कालीन सहायक निरीक्षक मनोहर दाभाडे यांनी सर्व महत्त्वाचे पुरावे, साक्षी नोंदवित सिंधूविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सिंधूबाईच्या माहेरच्यांनी श्यामराव कांबळे यास पहिली बायको गेली, मुलगी गेली आता ही तुरुंगात गेल्यावर संसाराची राखरांगोळी होईल, अशी भीती घातली. त्यामुळे श्यामराव याने अखेरच्या सुनावणीत साक्ष फिरविली. बचावपक्षानेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे सांगून निदरेष मुक्ततेची मागणी केली. परंतु, दाभाडे यांनी लहान मुलीचा आणि शेजारच्या वृद्धेने त्या दिवशी सरपण घरात ठेवताना हटकल्याचा जबाब व घटनाक्रम सादर केला. न्यायालयाने सिंधूबाईस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. गेल्या 22 वर्षांच्या सेवेत दाभाडे यांनी कौशल्याने गुन्हे उघडकीस आणल्याने त्यांना विविध पदकांसह गौरविण्यात आले आहे.