आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छडा रेल्वे लुटारूंच्या टोळीचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगाेली - अकाेला लाेहमार्गावर धावत्या पॅसेंजरमध्ये घुसून शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणारी टाेळी सक्रिय हाेती. या टाेळीला पायबंद घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल अाणि हिंगाेली पाेलिसांच्या विशेष पथकांद्वारे प्रयत्न सुरू होते. मात्र, दराेड्यांचं सत्र राेखण्यात यंत्रणा कूचकामी ठरत होती. अशात नाशिकच्या पाेलिस उपायुक्त तथा तत्कालीन हिंगाेली पाेलिस अधीक्षक एन. अंबिका यांनी पदभार स्वीकारला. जेमतेम अाठवडाभरातच लुटीची पुनरावृत्ती झाली. या घटनेत ३०हून अधिक प्रवासी जखमी झाले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रं मोठ्या तत्परतेने आणि काैशल्यपूर्ण फिरवत टोळी जेरबंद करण्यात अंबिका यशस्वी ठरल्या. त्यामुळे चार वर्षे उलटूनदेखील ही धैर्यकथा स्थानिक लोकांसह रेल्वे यंत्रणांच्या मनात घर करून अाहे.
पाेलिस अधीक्षकपदाची सूत्रं स्वीकारून एन. अंबिका यांच्याकडून हिंगाेली जिल्ह्याची हद्द समजावून घेण्यातच पहिले चार-पाच दिवस गेले हाेते. अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा अाढावा घेत असताना सर्वाधिक गुन्हे रेल्वेमार्गालगतच्या गावांमध्येच हाेत असल्याचं समाेर अालं. स्थानिक पाेलिस अाणि रेल्वे पाेलिसांसमाेर प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टाेळीच्या मुसक्या अावळण्याचं माेठं अाव्हान हाेतं. यासाठी अाैरंगाबाद ते नांदेडपर्यंतची रेल्वे पाेलिसांची वेगवेगळी पथकं कार्यरत हेाती. परंतु, पाेलिस पाेहोचेपर्यंत अाराेपी फरार हाेण्यात यशस्वी व्हायचे. त्यामुळे परिसरातील रहिवासी, प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण हाेतं. काही प्रवाशांना रेल्वेशिवाय पर्यायच नसल्याने हिंगाेलीनजीकचं कळमदुरी, नांदुरा स्टेशन अालं की, त्यांच्या पाेटात भीतीचा गाेळा उठायचा.
या टाेळीला नियंत्रणात अाणण्यासाठी अंबिका यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून वेगवेगळ्या उपाययाेजना करण्याचं ठरवलं. ग्रामस्थांशी संवाद वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्याच रात्री १२.३० वाजता अंबिका यांना रेल्वे मास्तरचा काॅल अाला. नांदूरानजीक पॅसेंजरमध्ये टाेळक्याने लूटमार सुरू केल्याचं कळवलं. जवळपास ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले होते. अंबिका यांनी ही रेल्वे हिंगाेली स्टेशनवर पाेलिसांकडून पूर्ण डबे तपासले जात नाहीत, ताेवर सोडण्याची सूचना केली. वायरलेसचा ताबा घेत जिल्ह्यातील पाेलिस अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून नाकेबंदीचे अादेश दिले. घटना कळवितानाच रेल्वेमार्गालगतच्या खेड्यापाड्यांवर पथकं पाठविण्याच्या सूचना दिल्या. रेल्वेस्थानकावर जाऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याबराेबर अंबिका यांनी जखमींना भेटून घटनाक्रम समजावून घेतला. दराेडेखाेरांचं वर्णन, बाेलीभाषा, पेहराव, हत्यारांची माहिती घेतली. ही माहिती सर्व अधिकाऱ्यांना वायरलेसवरून कळवली. नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि महिला प्रवाशांना विश्वासात घेत लुटारू नेमक्या काेणत्या ठिकाणी उतरले, अशी विचारणा केली.

घनदाटजंगल, तीन तासांची माेहीम : प्रवाशांनीलुटारू नांदुराजवळ पळाल्याचा अंदाज वर्तवला. अंबिका यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. नजीकच्या उपअधीक्षकांसह नांदुरा पाेलिस ठाण्यातल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बस-रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात शाेधमाेहीम राबविण्यास सांगितलं. स्वतःही त्या दिशेने निघाल्या. जवळपास पाच किलाेमीटर घनदाट जंगल असल्यानं नेमका शाेध कुठे अाणि कसा घ्यायचा, यावर खल सुरू झाला. यावर अंबिका यांनी कर्मचाऱ्यांना दुचाकी, जीपद्वारे अात जाईल तितकं जावं. तिथेच गाड्यांचे लाईट सुरू ठेवत पुढे पायी जाण्याची व्यूहरचना अाखली. कर्मचाऱ्यांनी एका हातात बंदुका अाणि दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन मजल-दरमजल प्रवास सुरू केला. जसजशी रात्र संपायला लागली, तसा पाेलिसांसाेबत स्थानिकांचा सहभाग वाढत गेला. पहाटेची वेळ, जंगल अाणि त्यात पहाडी भाग येताच पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला. पाेलिस सावध झाले. तेवढ्यात झाडावरून एक पिशवी खाली पडताच पाेलिसांचा संशय बळावला. कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे बॅटऱ्या झाडाच्या दिशेने करताच दाेन जण लटकलेले दिसले. वरच्या बाजूने अंगावर दगड, गाेटे पडायला लागले. पाेलिस जरा मागे हटताच ते उतरून पळण्याच्या तयारीत हाेते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. ही धरपकड सुरू असताना विरुद्ध बाजूने टेकड्यांवरून माेठमाेठे दगड पडत हाेते. कडेकडेने जाऊन पथकाने कपारीत लपलेल्या अाणखी दाेघांनाही ताब्यात घेतलं. शीघ्र कृती दल अाणि रॅपिड अॅक्शन फाेर्सच्या जवानांमुळे ते शक्य झालं. या पथकांचं नेतृत्व अंबिका यांनी केलं हाेतं.
टाेळीकडून४५ गुन्ह्यांची उकल : जेरबंदटाेळीची अंबिका यांनी सलग तीन-चार दिवस कसून चाैकशी केली. संशयित परभणी, अकाेला भागातील असल्याचं अाणि त्यांच्याविरुद्ध याच लुटमारीत प्रवाशांचा खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं. राज्यभरात दाखल असलेले ४० ते ४५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे टाेळीकडून उघडकीस अाणण्यात अाले. तपासानंतर गुन्हेगारांना रेल्वे पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

गुन्हासिद्धतेचं प्रमाणही लक्षणीय : तामिळनाडूच्यादिंधूकला येथील मूळ रहिवासी असलेल्या एन. अंबिका या २००९च्या अायपीएस बॅचच्या अधिकारी अाहेत. त्यांचा पाेलिस खात्यात भरतीपूर्वीचा संपूर्ण प्रवास संघर्षमय अाणि तितकाच प्रेरणादायी अाहे. विवाहानंतर पतीच्या मार्गदर्शनाखाली अायपीएस झालेल्या अंबिका गुन्हा उघडकीस अाणण्याबराेबरच अाराेपींना शिक्षेपर्यंत पाेहोचवण्याला अधिक प्राधान्य देतात. अहमदनगर, जळगाव अाणि अकाेल्यात अपर अधीक्षकपद, तर हिंगाेलीत अधीक्षकपदाचा दीड वर्षाचा कालावधी त्यांनी पूर्ण केला. अधीक्षकपदाच्या कार्यकाळात अंबिका यांच्या नेतृत्वाखाली दाखल ३५ गंभीर गुन्ह्यांत तब्बल ३३ गुन्ह्यांत अाराेपींना न्यायालयाने शिक्षा ठाेठावली. प्रवासी लूटमार करणारी टाेळी उघडकीस अाणल्याबद्दल त्यांचा रेल्वे पाेलिस दल, पाेलिस महासंचालकांनी अंबिका यांचा विशेष गाैरव केला हाेता. जळगावातही त्यांनी धडाकेबाज कारवाई केली. गेल्या मे महिन्यात शहरात दाखल झालेल्या अंबिका यांनी सिंहस्थासारख्या जागतिक उत्सवातही क्राइम ब्रँचची धुरा सांभाळली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दाैरे, त्यांचा बंदाेबस्त, भाविकांच्या सुरक्षिततेच्या िनयाेजनात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली!
बातम्या आणखी आहेत...