आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूगोल नाशिकचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - थंडीतल्या रम्य सकाळी आपल्या नाशिकच्या पांडवलेणीवरून तुमच्याशी बोलतोय..
अहाहा!! काय विलक्षण दृश्य आहे हे. उन्हं थोडी वर आलं तरी धुक्याचं पांघरूण ओढून अजून थोडं झोपतो म्हणत लहान मुलं कशी झोपतात तसंच अजूनही झोपलेलं नाशिक. तापमान फार-फार तर डिग्री किंवा ७. आत्ता आत्ता आपल्या नाशिकचं ५-६ डिग्री तापमान आपल्याला खूप कमी झाल्यासारखं वाटतं, पण सर्वात कमी म्हणजे किती तर ०.६ डिग्री एवढं तापमान नोंदवलं गेलं १९४५ साली आणि कमाल तापमान म्हणजे ४२.६ डिग्री साधारण १९६० मध्ये.
तसं आपल्या नाशिकचं हवामान प्रकृती स्वास्थ्यासाठी उत्तमच. म्हणूनच म्हणतात ना "या, नाशिकची हवा खायला.' नाशिकच्या हवेतसुद्धा आपुलकी आहे. तीच प्रत्येकाला नाशिकशी, तिथल्या लोकांशी बांधून ठेवते. धार्मिक, औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे नाशिक लोकप्रिय तर आहेच, पण स्वतःची एक ओळख निर्माण करणारं एक शहरदेखील.
तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला आणि महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेला हा जिल्हा. सह्याद्रीच्या पायथ्याशी, गोदावरीतीरी वसलेलं हे टुमदार शहर. सह्याद्रीच्या पायथ्याशी म्हटलं तरी समुद्रसपाटीपासून साधारण २३०० फूट उंचीवर.
नाशिकला जिल्ह्याचा दर्जा मिळाला तो १८६९ मध्ये. स्वातंत्र्यानंतर १९४७ ते १९६० दरम्यान नाशिक हे मुंबई राज्याचा हिस्सा होतं. क्षेत्रफळाचा विचार करता २५९.१३ स्क्वेअर किमी क्षेत्रफळ असलेलं आपलं नाशिक महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २५९.१३ स्क्वेअर किमी हे क्षेत्रफळ फक्त नाशिक शहराचं असून, जिल्ह्याचं क्षेत्रफळ १५,५३० स्क्वेअर किमी आहे. उत्तरेकडून धुळे जिल्हा, पूर्वेला जळगाव, आग्नेयला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, नैऋत्येला ठाणे, पश्चिमेला गुजरातचे वलसाड आणि नवसारी असं चहुबाजूंनी वेढलेलं नाशिक.
हे शहर मुख्यत्वेकरून भागांमध्ये विभागलं गेलं आहे. नाशिक सबडिव्हिजन, मालेगाव सबडिव्हिजन, निफाड, कळवण आणि मालेगाव प्रदेश. यात नाशिक सबडिव्हिजनमध्ये दिंडोरी, नाशिक, नाशिकरोड, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर हा भाग येतो. तर, मालेगाव डिव्हिजनमध्ये चांदवड, मालेगाव, नांदगाव येतात. निफाड भागात निफाड, सिन्नर, येवला कळवण भागात कळवण, देवळा, बागलाण आणि सुरगाणा तालुके येतात. सध्या नाशिकला विभागून मालेगाव हा वेगळा जिल्हा करावा असे प्रयत्न चालू आहेत. ज्यायोगे मालेगाव, नांदगाव, कळवण, देवळा, बागलाण हे मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट करण्यात येतील.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असला तरी लोकसंख्येबाबतीत १४ व्या क्रमांकावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नाशिक शहराची लोकसंख्या १,४८६,९७३ एवढी होती आणि नाशिक जिल्ह्याची ४,९८७,९२३ एवढी. लोकसंख्येपैकी यूएसमधील मिसुरी राज्याची जेवढी लोकसंख्या आहे, साधारण तेवढी लोकसंख्या आपल्या नाशिकची. या लोकसंख्येपैकी ७,८४,९९५ एवढे पुरुष ७,०१,९७८ स्त्रिया. नाशिकमधील साक्षरतेचं प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत आहे. यामध्ये ९५ टक्के पुरुष, तर ८७ टक्के महिला आहेत.
नाशिकची बोलीभाषादेखील त्यामुळे मराठीच आहे. अर्थात मराठीच्या अजून दोन बहिणी अहिराणी आणि भिल्ली या भाषाही नाशिकच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. नाशिक, त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळे असल्याने येथे या दोन ठिकाणी काहीअंशी संस्कृतदेखील बोलली जाते.
बाहेरचे लोक इथं फिरायला किंवा आरामासाठी येतात तेव्हा त्यांच्यासाठी बसची सुविधा आहे. ट्रेन आहेत आणि झालंच तर विमानसेवासुद्धा आहे. अर्थात विमानसेवा शहरापासून थोडी दूर म्हणजे ओझर परिसरात आहे एवढंच काय ते. आणि शहरातल्या शहरात फिरायचं म्हणजे अगदीच भरपूर वेळ आहे तर सिटी बसेस, शेअर रिक्षांचा पर्याय आहे. परदेशी पाहुणे असतील तर टॅक्सी सर्व्हिसेससुद्धा आहेत. वेबसाइटवरून आपण ती माहिती मिळवू शकतो. बऱ्याचदा त्र्यंबकेश्वर किंवा शिर्डी येथे जाणारे लोक नाशिकला खास हक्काचं आरामाचं ठिकाण म्हणून राहतात.
गोदावरीच्या तीरावर वसलेलं शहर म्हणून नाशिकची ओळख असली तरी आपल्या नाशिकमध्ये वैतरणा, भीमा, गिरणा, काश्यपी आणि दारणा या नद्याही आहेत. नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून वाहत नाशिकला समृद्ध करतात. तसेच, जिल्ह्यातील पावसाचं प्रमाण पाहता सरासरी २६०० ते ३००० मि.मी. पाऊस पडतो. त्यातही तालुकापरत्त्वे बरीच तफावत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिमेला असलेलं नाशिक या नद्यांमुळे आणि इथं असलेल्या खनिज संपत्तीमुळे समृद्ध झालंय. नाशिकची द्राक्षं, तांदूळ, ऊस, कांदा यांचं उत्पादन निर्यातीच्या आकडेवारीवरून आपण अंदाज बांधू शकतो. नाशिकचं वातावरण द्राक्ष लागवडीसाठी उत्कृष्ट असल्यानं इथं वायनरीज् चांगल्या विकसित होऊन नाशिक "वाइन कॅपिटल' म्हणून नावारूपास आलं.
पांडवलेणीवरून खाली जरी नजर टाकली किंवा खाली असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकात चक्कर मारला तरी आपल्याला एक गोष्ट जाणवते की, स्मारकाची जागा आहे त्या स्थितीत म्हणजेच आहे तसा उंच -सखल स्थितीत ठेवून, त्या जागेचं सौंदर्य अबाधित राखत स्मारक बांधलं गेलंय. नाशिकही असंच काहीसं उंच- सखल आहे. जुन्या नाशिकमध्ये एकदा फिरून बघा.
आपल्या नाशिकची अजून एक ओळख होते ती इथल्या टेकड्या आणि पर्वतरांगांमुळे. नाशिकला उल्लेखनीय अशा तीन प्रमुख पर्वतरांगा आहेत. एक म्हणजे सेलबरी पर्वतरांग, दुसरी सातमाळा आणि तिसरी म्हणजे त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी. विविध पर्वतरांगांनी नटलेलं आपलं नाशिक असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे अनेक राजवटी इथं होत्या. त्यामुळे त्या-त्या काळात या पर्वतरांगांवर त्यांनी बांधलेले किल्ले आजही इथं बघायला मिळतात.
इंडस्ट्रिज म्हणायचं झाल्यास नाशिकचं अौद्योगिक क्षेत्र तीन ठिकाणी विभागलं गेलं आहे. ते म्हणजे सातपूर, अंबड आणि सिन्नर. इंडियन सिक्युरिटी प्रेस, इंडियन करन्सी प्रेस, नाशिकची टेक्सस्टाइल इंडस्ट्री, ज्यापैकी एक येवला भाग पैठणीसाठी, तर कार्पेटसाठी सुरगाणा, निर्यात सुलभ करण्यासाठी विल्होळी जकात नाका, त्याचबरोबर अनेक साखर कारखाने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या वाइन बनवणाऱ्या वाइनरीज्, आयटी कंपन्यांचा नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा वाटा आहे.
तर असं आहे, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूरनंतर शहरी विकासाच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावरचं आपलं लाडकं नाशिक!