आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NMC Commissioner Sanjay Khandare, Latest News In Divya Marathi

आयुक्त गैरहजर; महापौरांचे सर्मथन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दिवंगतांना श्रर्द्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आलेल्या महासभेला अलीकडच्या काळातील शिरस्त्याप्रमाणे आयुक्त संजय खंदारे अनुपस्थित राहिल्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले. महापौर अँड. यतिन वाघ यांनी मात्र खंदारे राज्य शासनाच्या बैठकीला गेल्याचे सांगत नेहमीप्रमाणे त्यांची पाठराखण केली.
आचारसंहितेमुळे महासभेत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांतील कॅमेरे खरेदी, एलईडी प्रकरणावरील अंतिम टप्प्यातील सुनावणी, तसेच आचारसंहितेचा भंग करीत तीन निविदा काढल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना घेरण्याची रणनीती नगरसेवकांनी आखली होती. दुसरीकडे, आयुक्तांनी शासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे कारण देत महापौरांकडे रजेचा अर्ज दिला व त्यांनी तो मंजूर केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण, रिपाइं नगरसेवक प्रकाश लोंढे आक्रमक झाले. ‘आयुक्त असे किती दिवस बैठकांना गैरहजर राहणार’, ‘त्यांना कोणी विचारणार आहे की नाही’, असे सवाल बडगुजर व लोंढे यांनी केले. आचारसंहितेच्या कालावधीत नगरसेवकांना अंधारात ठेवून मनमानी पद्धतीने निविदा काढल्या जात असून, त्या विषयावर आयुक्तांशी बोलायचे होते, असे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, महापौर वाघ यांनी तो विषय महासभेच्या कामकाजाशी संबंधित नसल्याचे कारण देत सभा तहकूब केली.