आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजमंदिरे, अभ्यासिकांना पालिका देणार सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची काेट्यवधी रुपयांची मालमत्ता नाममात्र दरात भाड्याने देण्याच्या प्रकाराबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याच्या अनुषंगाने मिळकत धाेरण जवळपास निश्चित झाले अाहे. १० अाॅगस्ट राेजी उच्च न्यायालयात हाेणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महापालिका ठरावाद्वारे भूमिका मांडणार अाहे. त्यात समाजमंदिरे, अभ्यासिका अशा समाजोपयाेगी कामे करणाऱ्या संस्थांना सवलत दिली जाणार असून, त्यासाठी महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या उपस्थितीत गटनेत्यांची बैठक झाली.

महापालिकेच्या काेट्यवधी रुपयांच्या मिळकती नाममात्र दराने दिल्याचा मुद्दा ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिकेद्वारे उपस्थित केला हाेता. यासंदर्भात अॅड. बाळासाहेब चाैधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. नगरसेविका तथा अामदार सीमा हिरे यांच्या प्रभागातील समर्थ अभ्यासिकेचे उदाहरण देत चाैधरी यांनी नाममात्र दराने दिलेल्या अभ्यासिकेतून लाखाेंचा नफा कमावला जात असल्याचा युक्तिवाद केला हाेता. दरम्यान, समर्थ अभ्यासिकेला ‘सील’ करण्याची कारवाई महापालिकेने केली हाेती. न्यायालयाने पालिकेच्या मिळकतींची माहिती घेऊन काेणाला किती भाड्याची अाकारणी केली, याची माहिती मागवली हाेती. त्यानुसार पालिकेने मिळकतींची माहिती तयार केली असून, मिळकत धाेरणासंदर्भात महासभेत चर्चा झाली, त्यावेळी समाजमंदिरे, अभ्यासिका समाजातील अार्थिक दुर्बलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिळकतींना सवलत देण्याची मागणी झाली हाेती. गटनेत्यांची समिती स्थापून धाेरण ठरवण्याचे अादेश महापाैरांनी दिले हाेते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत समाजमंदिरे, अभ्यासिका यांना सवलत देण्याची मागणी गटनेत्यांनी केली. गावठाण झाेपडपट्टी परिसरातील मिळकतींना जे भाडे ठरेल त्यापेक्षा ५० टक्के सवलत देण्याची मागणी पुढे अाली. व्यावसायिक वापर करणाऱ्यांना रेडीरेकनरनुसार दर अाकारणी करण्याची सूचनाही गटनेत्यांनी केली. या वेळी उपमहापाैर गुरुमित बग्गा, सभागृह नेते सलीम शेख, विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, गटनेते अजय बाेरस्ते, अनिल मटाले, संभाजी माेरुस्कर, संजय चव्हाण अादी उपस्थित हाेते. अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत मिळकत विभागाचे बी. यू. माेरे हेही उपस्थित हाेते.