सातपूर - इ. एस. आय. रुग्णालयामधील डॉक्टरांची मनमानी, रुग्णांची चाललेली हेळसांड आणि असुविधा बुधवारी पुन्हा एकदा खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेल्या भेटीत चव्हाट्यावर आली. अचानक दिलेल्या या भेटीत गोडसे यांनी हजेरी पुस्तक तपासले असता त्यात केवळ दोन डॉक्टर वगळता अन्य डॉक्टरांनी स्वाक्ष-याच केलेल्या नसल्याचे आढळले. रुग्णालयातील असुविधांबाबत ‘दिव्य मराठी’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत गोडसे यांनी ही भेट दिली.
खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी दुपारी इ.एस.आय. रुग्णालयात अचानक भेट दिली. प्रारंभी हजेरी पुस्तक तपासले असता त्यात अनियमितता आढळून आली. त्यानंतर संतप्त झालेल्या गोडसे यांनी डॉक्टरांना धारेवर धरत कारभार सुधारण्याची ताकीद दिली. विशेष म्हणजे स्वाक्षरी नसलेल्यांत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांचाही समावेश होता. त्यानंतर गोडसे यांनी औषध खरेदी रजिस्टर तपासले व साठ्याचा आढावा घेतला.
रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतातच कशी, आवश्यक औषधे खरेदीचा अधिकार असताना ती का केली जात नाही, याबाबत जाब विचारला. तसेच, रुग्णांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याची तंबी दिली. या वेळी त्यांच्यासमवेत कामगार विकास मंचचे प्रतिनिधी कैलास मोरे, भिवाजी भावले, नंदू गायकवाड, उत्तम खांडबहाले उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच करणार अधिका-यांची तक्रार
- प्राथमिक स्वरूपातील ही पहिलीच भेट होती. त्यात अनेक बाबतीत अनियमितता आढळून आली. अनेक तक्रारींत तथ्य दिसून आले असून, डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसबाबतचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार. - हेमंत गोडसे, खासदार
खासगी रुग्णालयाचा आधार
- मी गेल्या चार दिवसांपासून उपचारांसाठी दाखल आहे. परंतु, योग्य उपचार मिळालेले नाहीत. सोनोग्राफीसाठी मला खासगी रुग्णालयात जावे लागले. - विजय दराडे, रुग्ण
पाठपुराव्यानंतरही औषधे मिळाली नाहीत
- माझ्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यावरील औषधेदेखील या रुग्णालयात मिळत नाहीत. मी दहा दिवसांपासून औषध मिळावीत म्हणून पाठपुरावा करतो आहे. मात्र, रुग्णालयाकडून औषधे दिली जात नाहीत. तसेच, कधी मिळतील असे विचारले तर समाधानकारक उत्तरेही मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वच कुटुंबीय चिंतेत आहोत. - गौरव रावळ, रुग्णाचा मुलगा
हजेरी पुस्तक तपासल्यानंतर संतप्त झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले.