आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कालिदास’मध्ये नो आयटम साँग, अस्सल लावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कालिदास कलामंदिरात बुधवारी सायंकाळी अस्सल मराठमोठी, पारंपरिक लावणी रंगली. अलीकडच्या काळात अश्लील आयटम साँगमुळे वादात सापडलेल्या या नाट्यगृहात आक्षेपार्ह गाणे सादर न झाल्याने रसिकांनी लोककलेचा निर्भेळ आनंद लुटला. मराठी संस्कृतीला न शोभणार्‍या प्रकारांविरोधात ‘दिव्य मराठी’ने उघडलेल्या अभियानाला यामुळे यश आले आहे.

कालिदास कलामंदिरात होणार्‍या लावणी शोदरम्यान केले जाणारे अंगविक्षेप, काही रसिकांचे खुलेआम मद्यपान यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर महापालिका व पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. भविष्यात होणार्‍या प्रत्येक लावणी शोसाठी आयोजकांना पोलिसांची परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक कार्यक्रम कॅमेर्‍यातही टिपला जाणार आहे.

बुधवारी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुरक्षारक्षकांनी प्रत्येकाची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. खास आयटम साँग पाहण्यासाठीच आलेले काही आंबटशौकिन मात्र अपेक्षाभंग झाल्यामुळे मध्यांतरानंतर कलामंदिराबाहेर पडले. एक-दोन मद्यपींनी नृत्यकौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला असता पोलिस व सुरक्षारक्षकांनी त्यांना समज देत जागेवर बसवले. त्याचप्रमाणे, कार्यक्रमाच्या मध्यांतरानंतरही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आयोजक व कलामंदिराच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून आढावा घेतला.


कॅमेरे लवकरच
कॅमेरे एक-दोन दिवसात बसवण्यात येतील. प्रत्येक प्रेक्षकाची कसून तपासणी करण्यात येत असून प्रत्येक लावणी कार्यक्रमाला ही काळजी घेतली जाणार आहे. जे. के. कहाणे, व्यवस्थापक, कालिदास

राजकीय मंडळी गायब
शहरातील लावणी कार्यक्रमांवरच गंडांतर आल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांनी गोंधळ घालणार्‍या प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेजवरून कॅमेरे लावले होते. त्यातून सर्व हालचाली टिपण्यात येत होत्या. त्यामुळे लावणी शोसाठी आलेल्या राजकीय मंडळींनी काढता पाय घेतला.