आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात ‘एलबीटी’ न भरण्याचा व्यापार्‍यांचा ठाम निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्था करासाठी (एलबीटी) महापालिकेत व्यापारी नोंदणीही करणार नाहीत आणि हा करही भरणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या शब्दानुसार एक महिन्याची मुदत कर भरण्यास दिलेली असल्याने त्यांचा शब्द आम्ही प्रमाण मानतो, भले कर न भरल्यामुळे जेलमध्ये जायची वेळ आली तरी बेहत्तर, असा एकमुखी एल्गार व्यापार्‍यांनी रविवारी पुकारला.

नाशिक र्मचंट्स को. ऑप. बँकेच्या सभागृहात व्यापारी महासंघाची बैठक झाली. यात, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी व्यापार्‍यांना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर ‘फाम’चे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजन दलवानी उपस्थित होते.

एलबीटीच्या आंदोलनात अनेक राजकीय पक्षांनी व्यापार्‍यांना पाठिंबा दिला. व्यापार्‍यांच्या एकजुटीमुळेच राजकीय नेत्यांना त्यांची किंमत कळली असून, लोकतांत्रिक मार्गाने हे आंदोलन उभे राहिल्याचे ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांनी या वेळी सांगितले. मोर्चे, रक्तदान, जेलभरो, निवेदने यांसारखी आंदोलने करूनही असंवेदनशील सरकारला जाग न आल्याने बेमुदत आंदोलन हा शेवटचा पर्याय आमच्यासमोर होता, व्यापारीच नाही तर ग्राहकांचे एलबीटीत मोठे नुकसान होणार असल्याचे गुरुनानी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे व्यापार्‍यांचा रोष सरकारने या आंदोलनात पाहिला, आता एकजूट कायम ठेवा, एलबीटीबाबत काय निर्णय घ्यायचा तो स्थानिक स्तरावर घ्या, असा सल्लाही गुरुनानी यांनी व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींना दिला. या वेळी जितेंद्र बोरा, राहुल डागा, मयूर काळे, मदन पारेख यांसह विविध 22 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एस्कॉर्ट फी रद्द करण्याची मागणी : महापालिका हद्दीतील वाहनांना एस्कॉर्ट आकारू नये, या मागणीचे निवेदन नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ‘एलबीटी’ उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांना देण्यात आले. महापालिकेने भाडेतत्त्वावर अथवा मालकी तत्त्वावर व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून द्यावे. आडगाव येथील ट्रक टर्मिनसजवळील गाळे करारनामा पद्धतीने भाड्याने द्यावे, या ठिकाणी पाणी, पथदीप आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन असावे. असोसिएशनच्या सदस्यांना त्यांच्या कार्यालयांसाठी पूर्वीच्या जकात नाक्यांजवळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंघल, अभय छाजेड, इंद्रपाल चढ्ढा, जे. पी. इंदोलिया, सुरेश शर्मा, बजरंग शर्मा, उमेश व्यास, राजेश पारीख, चंद्रेश जैन आदी सहभागी झाले होते.


हे निर्णयही महत्त्वाचे
‘एलबीटी’ला विरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालणार, जो राजकीय पक्ष बाजू घेईल, त्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका स्थानिक स्तरावर घेतली जाणार व महासंघाचे प्रभागनिहाय अध्यक्ष निवडणार. ग्राहकांची जागृती करणार.


महापालिकेने जाहीर केले खाते क्रमांक
22 ते 31 मेपर्यंतचा कर भरणा व्यावसायिकांना 10 जूनपर्यंत करावा लागणार आहे. एचडीएफसी बॅँकेच्या 12467630000090 या क्रमांकावर आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या 60133858915 या खाते क्रमांकात एलबीटी कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिका उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी केले.