आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Manmad Mumbai Double Decker Train In Railway Budget

मनमाड-मुंबईदरम्यानची डबल डेकर झाली ‘साइडट्रॅक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मनमाड-मुंबईदरम्यान वातानुकूलित डबल डेकर गाडी सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने ही गाडी साइडट्रॅक झाली आहे. संयुक्त आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अखेरच्या अंदाजपत्रकात या गाडीला हिरवा कंदील दाखवला जाण्याची अपेक्षा बुधवारी फोल ठरली.


पंचवटी एक्स्प्रेसच्या धर्तीवर ही आरामदायक गाडी सुरू करण्याचा निर्णय घेऊन रेल्वेने जिल्ह्यातील प्रवाशांना सुखद धक्का दिला होता. या मार्गावर डबल डेकरला प्रवाशांचा मिळू शकणारा प्रतिसाद, आर्थिकदृष्ट्या वातानुकूलित गाडीची व्यवहार्यता याचीही प्रशासकीय पातळीवर चाचपणी करण्यात आली. भुसावळ मंडलाच्या वाणिज्य विभागाने प्रवासी संघटना, सल्लागार व रेल्वेशी संबंधित तज्ज्ञांना जून 2013 मध्ये पत्र पाठवून लेखी स्वरूपात प्रस्तावाची मागणी केली. रेल्वेच्या धोरणांची माहिती असल्याने वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन जाणकारांनी तत्काळ लेखी प्रस्ताव सादर केले. डबल डेकरची वेळ ‘पंचवटी’पूर्वीची असावी, डबल डेकरऐवजी पंचवटीच्या धर्तीवर साधीच गाडी सुरू करावी, ‘पंचवटी’ची वातानुकूलित बोगी आठवड्यातून दोनच दिवस भरत असल्याने संपूर्ण वातानुकूलित गाडीऐवजी साधी गाडी सुरू करावी, अशा स्वरूपाची मते प्रस्तावाद्वारे मांडण्यात आली होती. मात्र, आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेला अद्याप मूर्त स्वरूप प्राप्त झाले नसल्याने रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


जिल्ह्यातील हजारो नोकरदार, व्यावसायिक व अन्य प्रवासी पंचवटी, गोदावरी, तपोवन, राज्यराणी या गाड्यांनी रोज मुंबईला ये-जा करतात. त्यांना ‘पंचवटी’ सोयीची वाटत असल्याने तिच्या धर्तीवर नाशिक-मुंबई नवीन गाडी सुरू करण्याच्या जुन्या मागणीलाही हिरवा कंदील मिळाला नाही. कोकण रेल्वे मार्गावर प्रशासनाने डबल डेकरचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. मात्र, त्यापूर्वीच्या नाशिक मार्गावरील प्रस्ताव बासनात बांधून ठेवला.
रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन नाशिककर प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.


कार्यवाही सुरू
मुख्यालयाच्या आदेशानुसार डबल डेकरच्या प्रस्तावाची चाचपणी करून जाणकारांनी दिलेले लेखी मत वाणिज्य विभागाने मुख्यालयास सादर केले आहे. पुढची कार्यवाही अभियांत्रिकी, व्यावसायिक विभागांकडून सुरू आहे. नरेंद्र बोरीकर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक

अंमलबजावणी न करून पुन्हा एकदा अन्याय
नोकरदार, व्यावसायिकांसाठी मुंबईला सकाळी 10.15 पूर्वी व मुंबईहून नाशिकला रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचेल, या वेळेनुसार गाडी सुरू करण्याबाबत लेखी मत दिले होते. मात्र, त्याबद्दल निर्णय न घेऊन नाशिकवर पुन्हा एकदा अन्याय करण्यात आला आहे. - मनोहर पाटील, अध्यक्ष, नाशिक जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना