आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No One Want To Come Woman And Child Welfare Committee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला व बालकल्याण समितीवर नको गं बाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेची अर्थवाहिनी असणार्‍या स्थायी समितीचे सदस्यपद मिळण्यासाठी देव पाण्यात ठेवणार्‍या सदस्यांची कमी नाही; परंतु महिला व बालकल्याण समितीचे सदस्यपद मिळू नये म्हणून यंदा काही सदस्यांनी देव पाण्यात ठेवल्याची चर्चा आहे. दरम्यान, येत्या 17 ऑगस्ट रोजी या समितीची निवडणूक होणार आहे.

बहुसंख्य नगरसेवकांना स्थायी समितीचे सदस्य होण्याचे वेध लागतात. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षे असल्याने सर्व पक्षांतील सदस्यांना या समितीवर काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मनसे, राष्ट्रवादी व कॉँग्रेसने आपल्या सदस्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा ठेवून अधिकाधिक सदस्यांना यावर संधी दिली. तशाच प्रकारच्या महिला आणि बालकल्याण समितीसाठी मात्र फारसे नगरसेवक इच्छुक नाहीत, हे विशेष. या समितीवर वर्णी लागल्यास पुढील काळात स्थायीवर पाणी सोडावे लागेल, असा समज करीत महिला समितीवर नियुक्ती होऊ नये म्हणून काही सदस्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या नावाचा विचार केला जाऊ नये, अशी विनंती या सदस्यांकडून केली जात आहे. स्थायीच्या तुलनेत या समितीवर फारसे आर्थिक व्यवहार होत नसल्यानेच या समितीवर फारसे कोणी जायला तयार होत नाहीत, असे बोलले जात आहे.

बुधवारी गटनेत्यांची बैठक
महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची नियुक्ती येत्या 17 ऑगस्ट रोजी महासभेत होणार आहे. तत्पूर्वी येत्या बुधवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत सदस्य नियुक्तीचा कोटा गटनेत्यांना सांगण्यात येईल. त्यानंतर निवडीची प्रक्रिया होईल. एकीकडे या समितीवर सदस्यांची निवड करण्यासाठी तयारी सुरू असताना या समितीवर जाण्याची इच्छा नगरसेवकांना नसल्याचे स्पष्ट होत आहे.