आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Provision For Sinhastha Kumbha Mela In State Budget

राज्याच्या अर्थसंकल्पमध्‍ये कुंभमेळ्यासाठी एका दिडकीचीही नाही तरतूद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकला 2015 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एका दिडकीचीही तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे नाशिककरांची घोर निराशा झाली आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या दौर्‍यावर असताना कुंभमेळ्याकरिता निधी देणार असल्याचे आश्वासन नाशिककरांना दिले होते. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्यांना त्याची आठवण राहिली नसल्याची तीव्र भावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. उज्जैन येथे तीन वर्षांनंतर कुंभमेळा येणार असला तरी तेथे आत्तापासूनच पायाभूत सुविधा उभारणीचे काम सुरू आहे, याकडे अर्थसंकल्पपूर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष वेधत नाशकातील कुंभमेळा जवळ आला असतानाही निधीची तरतूद अर्थसंकल्पात नसल्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे लक्ष वेधल्याचे समजते. मात्र, तरीही अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही.


पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद शक्य

कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणार्‍या पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने तरतूद करण्याबाबत आता पुढे नाशिकच्या आमदारांना प्रश्न उपस्थित करून निधीच्या तरतुदीची जोरदार मागणी करावी लागेल. त्यानंतर पुरवणी सूचीत यासाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे.


पालिकेकडून 2505 कोटी रुपयांचा प्रस्ताव
कुंभमेळ्यासाठी महापालिकेने पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 2505 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. याचा विचार करता किमान 500 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात अपेक्षित होती.


पाच तीर्थस्थळांना मिळणार निधी
ब वर्ग दर्जाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीत वाढ करून तो दोन कोटी रुपये करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात ब वर्गातील पाच तीर्थक्षेत्रे असून, त्यांना याचा लाभ होईल. ही ठिकाणे अशी : दत्तमंदिर चिकारी (ता. दिंडोरी), नीळकंठ महादेव मंदिर, देवघर (ता. दिंडोरी), खंडेराव महाराज मंदिर, खेडगाव (ता. दिंडोरी), खंडेराव महाराज मंदिर, ओझर (ता. निफाड), रेणुकादेवी मंदिर, चांदवड.


नाशकातील सीसीटीव्ही यंत्रणेचे काय?
अर्थसंकल्पात राज्यातील कायदा सुव्यवस्था तसेच मुंबई, पुणे व इतर शहरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 149 कोटी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. नाशिकमधील प्रमुख 50 चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सुमारे आठ कोटी रुपयांच्या निधींचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत आमदारांकडूनही पाठपुरावा सुरू होता. परंतु, अर्थसंकल्पात मात्र नाशिकचा उल्लेख करण्यात आला नाही.


राज्य शासनाकडून दुजाभाव
स्थायीच्या सदस्यांची निवड झालेली नाही याची माहिती मुख्यमंत्री घेतात; मात्र वर्षभरापूर्वीच्या प्रस्तावावर कुठलाच निर्णय होत नाही. कुंभमेळ्याच्या कामात राजकारण न आणण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यासाठी तरतूद नसल्याने नाशिककरांची घोर निराशा झाली आहे. अँड. यतिन वाघ, महापौर


कुंभमेळा भरवायचा की नाही
कुंभमेळा तोंडावर आला आहे. मात्र, आपल्या राज्य शासनाने एक रुपयाचीही तरतूद केली नसल्याने कुंभमेळा भरवायचा की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. महंत कृष्णचरणदास महाराज, चतु:संप्रदाय आखाडा


साधू-संतांच्या पदरी निराशा
तोंडावर आलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील साधूंचे राज्याच्या अंदाजपत्रकाकडे डोळे लागून होते. पण, आमच्या पदरी निराशाच पडली. कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी निश्चित निधी ठेवला पाहिजे. महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती