आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • No Teacher Salary From Last Two Month In Nashik District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डाटा एन्ट्रीत अडकले दोन महिन्यांचे वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - कधी सर्व्हरची गती मंद तर कधी बदल्यांची अडचण, 2013 च्या शिक्षक निश्चितीनुसार माहिती पुनर्नोंदणी आणि निमशिक्षकांचा अंतर्भाव करण्यासाठी पुन्हा काम वाढल्याने ऑनलाइन पगाराला वारंवार अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत.

नवीन पगार पद्धतीसाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी दोन महिन्यांपूर्वीच प्रशिक्षित करण्यात आले. ऑनलाइन पगारासाठी माहिती भरण्याचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले होते. जून अखेरपर्यंत कामकाज पूर्ण होते न होते तोच निमशिक्षकांची माहिती भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्याने ऑनलाइन पेमेंट योजना लांबणीवर पडली. त्यासाठी अजून किमान दोन महिने वाट पहावी लागणार असल्याचे समजते. मुळातच ऑनलाइन पेमेंटकरिता माहिती अपलोड करण्याचे काम संथ गतीने सुरू होते. त्यात अनेकदा बदल सूचविल्याने ऑनलाइन पगार लांबणीवर पडले आहेत.

गृहकर्ज, विम्याचे हप्ते थकले
प्राथमिक विभागाचे पगार जानेवारी 2014 पासून ऑनलाइन पद्धतीने देण्याचे उद्दिष्ट होते. माहिती भरण्यास येणा-या अडचणींमुळे नवीन आर्थिक वर्षात मे महिन्याचा पगार ऑनलाइन पद्धतीने होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. परंतु, ऑनलाइन पगार मिळणे तर दूरच मे व जूनचा पगार प्रचलित पद्धतीनेही निघाला नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणी सापडले आहेत. गृहकर्ज व विम्याचे हप्ते थकले आहेत. खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे पगार ऑफलाइन पद्धतीने झाले असून, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे वेतन ऑनलाइन होईल तेव्हा होतील, परंतु, ऑफलाइन तरी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ऑनलाइन कामात आले अडथळे
वर्षभरापूर्वी माहिती भरण्यास सुरू झालेले काम सर्व्हरच्या गतीअभावी अडखळत सुरू होते. एका शिक्षकांची माहिती भरण्यास दोन तासाचा कालावधी जात होता. त्यात सुधारणा झाल्यानंतर कोअर बँकिंगमुळे अडचण प्राप्त झाली. त्यात अनेक शिक्षकांचे आधारकार्ड काढलेले नव्हते. या समस्येवर मात केल्यानंतर मार्च महिन्यातील केंद्रप्रमुखांच्या प्रशासकीय बदल्यांची अडचण निर्माण झाली. आरंभीला 2012 च्या शिक्षक निश्चिती निकषानुसार माहिती भरली गेली. शिक्षण विभागाने त्यात बदल सुचवून 2013 नुसार माहिती भरण्या सांगितले. पुन्हा त्यात बदल करण्याचे काम झाले. आता निमशिक्षकांची माहिती भरली जात आहे. त्याची यापूर्वीची माहिती अपलोड करण्यात समावेश नव्हता. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट उपक्रमाचीच शाळा झाल्याचे बोलले जात आहे.

लवकरच पगार होतील
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे वेतन ऑनलाइन देण्याबाबत काम चालू आहे. राहिलेले पगारही लवकरच होतील, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आर. एस. मोगल, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी