आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंते-वास्तुशास्त्रज्ञांचा मंगळवारी ‘नो व्हेइकल डे’;‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘दिव्य मराठी’च्या इंधन बचतीच्या आवाहनाला शहरातील विविध संघटनांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अभियंते आणि वास्तुशास्त्रज्ञ 17 सप्टेंबरला ‘नो व्हेइकल डे’ पाळणार आहेत. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स व आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअर्स असोसिएशन या दोन्ही संघटना हा उपक्रम राबवणार आहेत.

कार, मोटारसायकल न वापरता सार्वजनिक वाहने आणि सायकलचा वापर संघटनांचे सहाशे सदस्य आणि या क्षेत्रात कार्यरत पाच हजार कर्मचारी करणार आहेत. ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानाची सुरुवात 16 सप्टेंबरला उद्योजकीय संघटनांकडून होत आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी क्षेत्रातील संघटनांनी ‘नो व्हेइकल डे’चा निर्धार केला आहे. यामुळे मंगळवारी शहरातील रस्त्यांवर एक हजार कार आणि किमान पाच हजार दुचाकी कमी दिसतील.

इंधन आयातीपोटी देशाला मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागत असल्याने रुपयाचे अवमूल्यन होत असून, महागाईही वाढत आहे. देशाच्या गंभीर आर्थिक स्थितीला इंधनाची वाढती आयात जबाबदार असून, ती नियंत्रणात आणण्यासाठी इंधन बचतीचे आवाहन स्वत: पंतप्रधानांनीही केले आहे. याच पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबरला नांदगावकरांनी आठवड्यातील एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करण्याचे ठरवले. त्याचे कौतुक करीत नाशिककरांनीही त्याची सुरुवात करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’ने ‘या बिंदूचा सिंधू होवो’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सार्वजनिक सेवेने प्रवास
मंगळवारी आम्ही सर्व सदस्य आणि त्यांच्याकडील कर्मचारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शक्यतो सायकलचाच वापर करणार आहोत. आमची वाहने रस्त्यावर उतरणार नाहीत. दर आठवड्याच्या मंगळवारी याच पद्धतीने ‘नो व्हेइकल डे’ साजरा करणार आहोत. -विजय सानप, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स

सायकलचा उपयोग करणार
आमचे सर्व सदस्य आणि त्यांच्याकडील सर्व कर्मचारी अभियानात सहभागी आहोत. देशाची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने देशहितासाठी प्रत्येकाने किमान आठवड्यातून एक दिवस इंधनबचत करण्याची गरज आहे. आम्ही सर्व मंगळवारी सायकल आणि सार्वजनिक वाहतुकीचाच उपयोग करणार आहोत. -आर. के. सिंघ, उपाध्यक्ष, आर्किटेक्ट्स अँण्ड इंजिनिअर्स असोसिएशन