आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नो व्हेइकल डे’साठी सरसावली सिटी बस; ‘या बिंदूचा सिंधू होवो’ला प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंधन बचतीसाठी ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ‘या बिंदूचा सिंधू होवो’, या आवाहनाला उद्योग जगतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयमा, निमा, नाइस या उद्योजकांच्या संघटनांसह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस या व्यापार्‍यांच्या संघटनाकडून सोमवारी (दि. 16) जाहीर करण्यात आलेल्या ‘नो कार डे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एसटी महामंडळाने स्वत: पुढाकार घेत या दिवशी अतिरिक्त शहर बसेस प्रवाशांच्या वाहतुकीकरिता उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. या दिवशी केवळ उद्योजकच नाही, तर शहराच्या विविध भागातून नोकरीसाठी औद्योगिक वसाहतीत जाणार्‍या कामगारांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन या संघटनांकडून करण्यात येत आहे.

एसटीचे विभागीय नियंत्रक कैलास देशमुख यांच्यासह आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांची ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात याबाबत चर्चा झाली.

मागाल तेथे बस उपलब्ध करू
एसटीकडून उद्योजक व कामगारांसाठी ‘मागतील त्या ठिकाणी व पाहिजे त्या वेळेस’ बस देण्यात येतील. काही मोठय़ा कंपन्यांसाठी स्वतंत्र बसफेर्‍या सुरू असून, या कंपन्यांचे कामगार यात सहभागी झाल्यास सोमवारी बस संख्या तिप्पट करण्यात येईल. -कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक, एसटी

चला शहर बसने जाऊ
या अभियानात जास्तीत जास्त उद्योजक, कामगारांनी सहभागी व्हावे. मोठय़ा कंपन्यांना यात सहभागी होण्याबाबत कळविले जाणार आहे.
-मंगेश पाटणकर, सरचिटणीस, निमा

आम्ही स्वत: सोमवारी बसचा वापर करणार असून, कामगारांनी वाहनांचा वापर करू नये, कंपन्यांनी यात पुढाकार घ्यावा, व्यापार्‍यांनीही बससेवाच वापरावी. - संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर

>एसटीकडून बसेस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आल्याने उद्योजक, कामगारांना ते सोयीचे ठरणार आहे. -सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा

तुमच्या मार्गदर्शक सूचना येथे कळवा
‘दिव्य मराठी’ने सुरू केलेले हे अभियान देशाला सर्मपित आहे. आर्थिक संकटाच्या काळात इंधनावरील वाढता परदेशी चलनाचा खर्च कमी व्हावा याकरिता उचललेले हे छोटेसे पाऊल असून, यात कुणालाही वैयक्तिकरित्या किंवा तुमच्या संघटनेलाही सहभागी होता येईल. याबाबत काही मार्गदर्शक सूचना किंवा माहिती द्यायची असल्यास संपर्क : संजय भड (मोबाइल क्रमांक : 8390905725)