आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Water Short During Ramjan Month In Malegaon City

मालेगाव शहरात रमजानसाठी मुबलक पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - धरणांमधील जलसाठा संपुष्टात येत असल्याने महापालिकेने तळवाडे साठवण तालव व गिरणातील पाणी उचलण्याच्या नियोजनात बदल केला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सध्याच्या पद्धतीनेच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीकपात तूर्त लांबणीवर पडली आहे.
रमजान महिना संपेपर्यंत मात्र पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. अर्थात, एका वॉर्डात एक दिवसाआड पाणी मिळत असले तरी शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात दररोज पाणी वितरण सुरूच असते. यासाठी पाणीपुरवठा विभागाचे जलशुद्धीकरण केंद्र चोवीस तास कार्यान्वित आहे. परंतु, पालिकेने चणकापूर धरणात केलेल्या आरक्षणातील शेवटचा जलसाठा उचलला असून, आरक्षण संपुष्टात आले आहे. तर, गिरणा धरणात अद्यापही 180 ते 200 दलघफू आरक्षित जलसाठा आहे.
पावसाळा लांबल्याने सध्यातरी नव्याने पाणी उपलब्धतेची चिन्हे नाहीत. परंतु, शहरात सुरू असलेल्या रमाजन महिन्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने पाणीकपात तूर्त लांबणीवर टाकली आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठ्यांच्या वापराचे नियोजन बदलले आहे. तळवाडेमधील पाणी उपसा निम्म्यावर आणला असून, गिरणा धरणातील पाणी वापर दुप्पट केला आहे. याच पद्धतीने पाणी घेतले तर शहरात आणखी दीड महिना तरी पाणीटंचाई जाणवणार नाही. साधारणत: जलैअखेरपर्यंत जोरदार पाऊस येऊन धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही तर मात्र प्रशासनाला पाणीकपात अपरिहार्य आहे. तळवाडे बंधा-यातील जलसाठा 15 ऑगस्टपर्यंत पुरविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तोपर्यंत जोरदार पाऊस झाला नाही तर शहराची पाणीपुरवठ्याची मदार फक्त गिरणा धरणातील जलसाठ्यावर अवलंबून राहील. यानंतर पाणी उपसा व वितरणाचे फेरनियोजन करावे लागणार आहे. मात्र, गिरणा धरणातील जलउपलब्धता पाहता अशा स्थितीतही पाणीटंचाईची फारशी शक्यता नसेल, अशी परिस्थिती आहे.

अशी आहे पार्श्वभूमी
गेल्या वर्षी धरणांमधील पाणी आरक्षणावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत चणकापूरवरील दावा- प्रतिदावा चर्चेत आला होता. याच वेळी गिरणा धरणात तातडीने वाढीव आरक्षणाचा करार करण्याच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती. भविष्यातील पाणी नियोजन करण्यासाठी तातडीने 22 एप्रिलपासून पाणीकपात करून शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर 29 एप्रिलपासून नियोजनात बदल करीत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ झाला. या पद्धतीने 1 ऑगस्ट 2013 पर्यंत पाणीपुरवठा सुरू होता. यानंतर पावसाने दिलासा दिल्याने पूर्ववत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. तेच नियोजन आजपर्यंत कायम आहे.

जुलैनंतर निर्णय घेणार
- सध्या रमजान महिना सुरू असल्याने पाणीकपातीचा विचार नाही. परंतु, महिनाभरात चांगला पाऊस झाला नाही तर ऑगस्टच्या प्रारंभी निर्णय घ्यावा लागेल. परंतु, सध्याच्या पद्धतीने 20 ऑगस्टपर्यंत पाणी वितरण करता येऊ शकते. तळवाडेचा साठा संपुष्टात आला तर गिरणा धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करावा लागेल. गेल्या वर्षी असा प्रयोग झाला आहे. थेट धरणात पंप टाकून पाणी घेता येईल. अजित जाधव, आयुक्त

बदलापूर्वीचे नियोजन
गेल्या 1 जुलैपर्यंत चणकापूर कालव्यातून तळवाडे साठवण तलावात पाणी येत होते. या काळात तळवाडेमधून दैनंदिन 20 एमएलडी, तर गिरणातून फक्त 15 ते 16 एमएलडी पाणी घेतले जात होते. कालवा बंद झाल्यानंतर मात्र तळवाडेतील उपलब्ध साठा पुढे दीड महिना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तळवाडेपेक्षा गिरणा धरणातून पाण्याची अधिक उचल केली जात आहे. परंतु, शहरातील पाणीपुरवठ्यात कोणताही बदल नाही.